चांदीचे दर आभाळाला भिडले
जळगाव, 29 डिसेंबर (हिं.स.) शहरात सोने-चांदीच्या दरवाढीचा वेग दिवसागणिक वाढतच असून, रविवारी चांदीच्या दरात पुन्हा सहा हजार रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचा दर थेट किलोमागे २ लाख ५३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर सोन्याच्या दरा
चांदीचे दर आभाळाला भिडले


जळगाव, 29 डिसेंबर (हिं.स.) शहरात सोने-चांदीच्या दरवाढीचा वेग दिवसागणिक वाढतच असून, रविवारी चांदीच्या दरात पुन्हा सहा हजार रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचा दर थेट किलोमागे २ लाख ५३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर सोन्याच्या दरातही ७०० रुपयांची वाढ झाली असून, १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ४० हजार ४०० रुपयांवर गेला आहे. विशेष म्हणजे अवघ्या ११ दिवसांतच चांदीने दोन लाखांवरून अडीच लाखांचा टप्पा पार केल्याने ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून चांदीच्या भावात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत असून, २६ डिसेंबर रोजी तब्बल १० हजार ५०० रुपयांची तर २७ डिसेंबर रोजी १४ हजार ५०० रुपयांची वाढ झाली होती. केवळ दोन दिवसांत २५ हजार रुपयांची उसळी घेत चांदीचा दर २ लाख ४७ हजार रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा सहा हजार रुपयांची वाढ झाल्याने दर २ लाख ५३ हजारांवर स्थिरावले आहेत. बाजारात चांदीची मागणी वाढलेली असतानाच उपलब्धतेचा तुटवडा जाणवत असल्याने भाव आणखी वाढत असल्याचे जाणकार सांगतात.दरम्यान, गेल्या ११ दिवसांत चांदीच्या दरात एकूण ५१ हजार रुपयांची वाढ झाली आहे. १७ डिसेंबर रोजी चांदीचा दर २ लाख १ हजार ५०० रुपये होता. २० डिसेंबरला तो २ लाख ९ हजारांवर, २४ डिसेंबरला २ लाख २२ हजारांवर, २६ डिसेंबरला २ लाख ३२ हजार ५०० रुपयांवर, २७ डिसेंबरला २ लाख ४७ हजार रुपयांवर पोहोचला. अखेर २८ डिसेंबर रोजी चांदीने २ लाख ५३ हजार रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. वाढत्या दरांमुळे ऐन लग्नसराईच्या तोंडावर ग्राहकांची चिंता वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande