रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांतता कराराच्या 'खूप जवळ'- ट्रम्प
वॉशिंग्टन , 29 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथील त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितले की रशिया–युक्रेन युद्ध समाप्त करण
रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांतता कराराच्या 'खूप जवळ'- ट्रम्प


वॉशिंग्टन , 29 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथील त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितले की रशिया–युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठीचा शांती करार आता “खूप जवळ” आला आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की महत्त्वपूर्ण प्रगती झाली असून चर्चा फलदायी आणि व्यापक ठरल्या आहेत. त्यांनी युद्ध समाप्त करणे ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट करत संघर्षात झालेल्या मानवी हानीवरही भर दिला.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आमची एक अत्यंत उत्तम बैठक झाली आणि आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तुम्हाला माहीतच आहे की माझी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी दोन तासांहून अधिक काळ चाललेली एक उत्कृष्ट फोन चर्चा झाली होती. आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मला वाटते की आपण खूप जवळ येत आहोत—कदाचित फारच जवळ. आम्ही युरोपीय नेत्यांशीही चर्चा केली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरचे कदाचित सर्वात घातक युद्ध संपवण्याच्या दिशेने आम्ही मोठी प्रगती केली आहे.”

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की शांती करार “जवळ” असल्याचा त्यांना विश्वास आहे, मात्र काही “कठीण” मुद्दे अजूनही प्रलंबित असल्याचे त्यांनी मान्य केले. यातील एक मुद्दा विशेषतः संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप न सुटलेल्या “सर्वात कठीण मुद्द्यां”बाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले, “जमीन—त्या जमिनीचा काही भाग ताब्यात करण्यात आला आहे… सध्या करार करणेच अधिक योग्य ठरेल.”

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सांगितले की, “आमची उत्कृष्ट बैठक झाली आणि आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मला वाटते की आपण कराराच्या खूप जवळ पोहोचलो आहोत. दुसऱ्या महायुद्धानंतरचे कदाचित सर्वात प्राणघातक युद्ध संपवण्याच्या दिशेने आम्ही मोठी प्रगती केली आहे.”

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की युद्ध समाप्तीसाठी कोणतीही अंतिम मुदत ठरवलेली नाही आणि त्यांचे संपूर्ण लक्ष युक्रेन युद्ध समाप्त करण्यावर आहे. त्यांनी सांगितले की प्रत्येकालाच हे युद्ध संपावे असे वाटते. “मलाही हे युद्ध संपवायचे आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक मरताना पाहणे मला नको आहे,” असे ते म्हणाले.

ट्रम्प यांनी मान्य केले की पूर्व डोनबास क्षेत्र हा एक मोठा मुद्दा ठरला आहे, ज्याबाबत रशियाने तो प्रदेश युक्रेनकडून ताब्यात देण्याची मागणी केली आहे. झेलेन्स्की यांच्या उपस्थितीत ते म्हणाले, “या मुद्द्यावर आम्ही कराराच्या जवळ पोहोचत आहोत. हा नक्कीच एक मोठा मुद्दा आहे आणि मला वाटते की आपण त्याच्या खूप जवळ आहोत.”

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेत संभाव्य शांती कराराच्या सर्व प्रमुख पैलूंवर चर्चा झाली. ते म्हणाले, “आम्ही सर्व विषयांवर उत्कृष्ट चर्चा केली. शांतीच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर चर्चा झाली आहे.”झेलेन्स्की यांनी पुढे सांगितले की अनेक आघाड्यांवर आधीच महत्त्वपूर्ण सहमती निर्माण झाली आहे. “२० मुद्द्यांच्या शांती योजनेवर सुमारे ९० टक्के सहमती झाली आहे. अमेरिका–युक्रेन सुरक्षा हमीवर १०० टक्के सहमती आहे आणि अमेरिका–युरोप–युक्रेन सुरक्षा हमीवरही जवळजवळ सहमती झाली आहे. लष्करी बाबींवर १०० टक्के सहमती झाली आहे. समृद्धी योजनेला अंतिम स्वरूप दिले जात असून पुढील कारवाईच्या क्रमावरही चर्चा झाली आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “शाश्वत शांती साध्य करण्यासाठी सुरक्षा हमी हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्यावर आम्ही सहमत झालो आहोत. आमच्या टीम्स सर्व पैलूंवर काम करत राहतील. युक्रेन शांतीसाठी पूर्णपणे तयार आहे.”

ट्रम्प यांनी सांगितले की येत्या काही दिवसांत रशिया, युक्रेन आणि युरोपीय नेत्यांशी चर्चा सुरूच राहील. तसेच ट्रम्प यांनी मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये झेलेन्स्की यांच्यासाठी भव्य रात्री भोजाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये युक्रेन सरकारचे आणि ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी युरोपियन युनियनच्या नेत्यांशीही चर्चा केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande