
तिरुवनंतपुरम, 29 डिसेंबर (हिं.स.)भारतीय फलंदाज स्मृती मानधना महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०,००० धावा पूर्ण करणारी महिला ठरली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात तिने ही कामगिरी केली. मानधना हिने २८१ सामन्यांमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या आणि माजी भारतीय कर्णधार मिताली राजला मागे टाकले. मितालीने २९१ डावांमध्ये १०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या होत्या.
मानधनाने भारतीय डावाच्या सातव्या षटकात १०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठला. तिने निमशा मदुष्णीच्या गोलंदाजीवर एक धाव घेतली आणि जागतिक विक्रम रचला. स्मृती ही १०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठणारी चौथी महिला क्रिकेटपटू आहे. तिच्या आधी मिताली, न्यूझीलंडची सुझी बेट्स आणि इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स आहेत.
मानधना श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तिने एका चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेत श्रीलंकेविरुद्धची ही तिची पहिली अर्धशतकीय खेळी होती. तिने महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३२ व्यांदा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. महिला क्रिकेटमधील हा सर्वोच्च विक्रम आहे. तिच्यानंतर सुझी बेट्स आणि बेथ मुनी यांचा क्रमांक लागतो, ज्यांनी प्रत्येकी २९ पन्नास पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
मानधनाने ४८ चेंडूंचा सामना केला आणि ११ चौकार आणि तीन षटकारांसह ८० धावा केल्या. या खेळीत तिने भारतासाठी महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे