
वॉशिंग्टन , 29 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या निधीत मोठी कपात करत केवळ 2 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून संयुक्त राष्ट्रांच्या विविध मानवीय कार्यक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीत सातत्याने कपात केली जात आहे. ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांना इशारा देत म्हटले आहे की, त्यांनी नव्या वास्तवाची जाणीव करून घ्यावी, अन्यथा अस्तित्व धोक्यात येईल.
अमेरिकेकडून जाहीर करण्यात आलेली 2 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत ही पूर्वी दिल्या जाणाऱ्या मदतीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, मागील काही वर्षांत अमेरिका दरवर्षी सुमारे 17 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत संयुक्त राष्ट्रांना देत होती. यापैकी 8 ते 10 अब्ज डॉलर्स ही स्वेच्छा योगदान स्वरूपात दिली जात होती, तसेच अब्जावधी डॉलर्स सदस्यत्व शुल्काच्या रूपातही भरले जात होते.
याशिवाय इतर पाश्चिमात्य देशांनीही संयुक्त राष्ट्रांच्या निधीत कपात केली आहे. या निधी कपातीचा परिणाम संयुक्त राष्ट्रांच्या विविध मानवीय योजनांवर झाला आहे, कारण या योजना पूर्णपणे निधीवर अवलंबून आहेत. अमेरिकेच्या या निर्णयावर टीका करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, यामुळे लाखो लोक उपासमारीचे बळी ठरू शकतात, तर अनेकांना विस्थापन आणि आजारपणाचा सामना करावा लागू शकतो. तसेच यामुळे अमेरिकेच्या ‘सॉफ्ट पॉवर’लाही मोठा फटका बसेल.
अमेरिकेने निधी रोखण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांना खर्चात कपात करावी लागली असून, अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एकूण निधीतील सर्वात मोठा वाटा अमेरिकेकडून येत असल्याने, या कपातीचा थेट परिणाम संयुक्त राष्ट्रांकडून राबविण्यात येणाऱ्या मानवीय कार्यांवर होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode