
वेलिंग्टन, 29 डिसेंबर (हिं.स.)न्यूझीलंड क्रिकेटचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३५ वर्षीय ब्रेसवेल गेल्या काही काळापासून दुखापतींशी झुंजत होता. आणि त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला.त्याच्या कारकिर्दीत, त्याने न्यूझीलंडसाठी अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २०२३ मध्ये किवी संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
डग ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २८ कसोटी, २१ एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे डिसेंबर २०११ मध्ये होबार्ट कसोटी होती. जेव्हा त्याने त्याच्या तिसऱ्या कसोटीत फक्त ६० धावा देऊन ९विकेट्स घेतल्या होत्या. या शानदार कामगिरीमुळे न्यूझीलंडला २६ वर्षांनी ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकण्यास मदत झाली, जो आजपर्यंतचा त्यांचा शेवटचा कसोटी विजय आहे.कसोटी क्रिकेटमध्ये, ब्रेसवेलने २८ सामन्यांमध्ये ७४ बळी विकेट्स घेतल्या. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकूण ४६ विकेट्स घेतल्या.
१८ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट जाहीर करताना ब्रेसवेल म्हणाला, क्रिकेट हा माझ्या आयुष्याचा अभिमानास्पद भाग आहे. लहानपणापासूनच माझ्या देशासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते. मला मिळालेल्या संधींसाठी मी नेहमीच आभारी राहीन.
डग ब्रेसवेलच्या कुटुंबाचे क्रिकेटशी अतूट नाते आहे. त्याचे वडील ब्रेंडन आणि काका जॉन ब्रेसवेल यांनी कसोटी क्रिकेट खेळले आहे, तर जॉनने न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. तो त्याचा चुलत भाऊ मायकेल ब्रेसवेल सोबत न्यूझीलंडकडूनही खेळला, जो पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यावर एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
ब्रेसवेलने २००८ मध्ये फक्त १८ वर्षांच्या वयात सेंट्रल स्टॅग्ससाठी प्रथम श्रेणीत पदार्पण केले. त्याच्या प्रतिभेची ओळख पटवून, त्याची २०१० च्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी निवड झाली. ऑक्टोबर २०११ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले.
२०११ मध्ये त्याने किवी संघासाठी पदार्पण केले आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात उल्लेखनीय झाली. अनेक वरिष्ठ गोलंदाजांना झालेल्या दुखापतींमुळे त्याला झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी पदार्पण मिळाले. पदार्पणाच्या दुसऱ्या डावात त्याने पाच विकेट्स घेऊन सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर त्याने त्याची प्रभावी कामगिरी सुरूच ठेवली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त ब्रेसवेलने आयपीएल २०१२ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, एसए२० २०२४ मध्ये जोबर्ग सुपर किंग्ज आणि स्थानिक क्रिकेटमध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्ट्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावली. डग ब्रेसवेलच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक अद्वितीय विक्रम आहे: ४,००० पेक्षा जास्त धावा आणि ४०० पेक्षा जास्त विकेट्स, न्यूझीलंडमध्ये फार कमी क्रिकेटपटूंनी हा पराक्रम केला आहे. त्याच्या १३७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ४३७ विकेट्स आणि ४५०५ धावा केल्या आहेच.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे