
ढाका , 30 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) यांच्या अध्यक्षा खालिदा झिया यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले आहे. बीएनपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत ही माहिती दिली. पक्षाने सांगितले की, अनेक आरोग्य समस्यांशी झुंज देत असलेल्या या अनुभवी नेत्या यांनी अखेरचा श्वास घेतला.
पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, खालिदा झिया यांनी आज सकाळी सुमारे 6 वाजता ढाक्यातील एव्हरकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या 36 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होत्या. 23 नोव्हेंबर रोजी हृदय आणि फुफ्फुसांतील संसर्गानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याशिवाय त्या न्यूमोनियानेही ग्रस्त होत्या.
बीएनपीच्या निवेदनात म्हटले आहे की, बीएनपीच्या अध्यक्षा, माजी पंतप्रधान आणि राष्ट्रीय नेत्या बेगम खालिदा झिया यांचे आज सकाळी फज्र नमाजीनंतर निधन झाले. पक्षाने नागरिकांना त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दुवा करण्याचे आवाहन केले आहे.यापूर्वी रविवारी उशिरा डॉक्टरांच्या हवाल्याने खालिदा झिया यांची प्रकृती ‘अत्यंत गंभीर’ असल्याचे सांगितले होते. वैद्यकीय मंडळाचे सदस्य डॉ. जियाउल हक यांनी सांगितले की, त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना नियमितपणे किडनी डायलिसिसची गरज भासत होती. डायलिसिस थांबवले की त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत होती.
मीडिया रिपोर्ट्स आणि पक्षाच्या माहितीनुसार, प्रकृती अधिक बिघडत चालल्याने महिन्याच्या सुरुवातीला त्यांना परदेशात उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अत्यंत अशक्त प्रकृतीमुळे हे शक्य होऊ शकले नाही.याआधीही खालिदा झिया यांना यकृत, मूत्रपिंड, मधुमेह, संधिवात आणि डोळ्यांच्या आजारांसह अनेक आरोग्य समस्या होत्या. याच पार्श्वभूमीवर या वर्षी 6 मे रोजी त्या लंडनहून भारतात परतल्या होत्या आणि त्यानंतर बांगलादेशात चार महिने प्रगत वैद्यकीय उपचार घेतले होते.
खालिदा झिया या दोन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान राहिल्या होत्या. त्यांनी पहिल्यांदा 1991 ते 1996 या कालावधीत आणि दुसऱ्यांदा 2001 ते 2006 या काळात देशाचे नेतृत्व केले. त्या माजी राष्ट्राध्यक्ष आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे संस्थापक झियाउर रहमान यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या बीएनपी पक्षाने 1979, 1991, 1996 आणि 2001 मध्ये सत्ता मिळवली होती. शेख हसीना यांच्या काळात बीएनपी हा बांगलादेशमधील प्रमुख विरोधी पक्ष राहिला आहे. त्यांचा मोठा मुलगा आणि बीएनपीचा कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान हा 2008 पासून लंडनमध्ये वास्तव्यास होता आणि तो याच महिन्यात बांगलादेशात परतला होता. त्यांचा धाकटा मुलगा आराफात रहमान याचे 2015 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 3 डिसेंबर रोजी बीएनपीने 237 जागांसाठी उमेदवारांची घोषणाही केली होती. मात्र, आता खालिदा झिया यांच्या निधनामुळे समर्थकांमध्ये शोककळा पसरलेली दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode