
जेरुसलेम, 30 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या इस्रायल शांतता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी फ्लोरिडामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
नेतन्याहू म्हणाले की, इस्रायली सरकारने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना इस्रायल शांतता पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 80 वर्षांत कोणत्याही गैर-इस्रायली नागरिकाला हा पुरस्कार देण्यात आलेला नाही, तसेच शांतता श्रेणीत हा पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ आहे.या घोषणेवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही आनंद व्यक्त केला आणि हा सन्मान आपल्यासाठी अनपेक्षित असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेदरम्यान इस्रायली पंतप्रधान म्हणाले,
“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लोकांना चकित करण्यासाठी अनेक परंपरा मोडल्या आहेत. त्यामुळे आम्हीही एक परंपरा मोडून नवी परंपरा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 80 वर्षांत कोणत्याही गैर-इस्रायली नागरिकाला न दिला गेलेला इस्रायल पुरस्कार आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना देणार आहोत. जेवणादरम्यान आमच्या शिक्षणमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. इस्रायली आणि यहुदी लोकांच्या कल्याणासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जाईल.” नेतन्याहू पुढे म्हणाले,“इस्रायली जनतेसाठी आपण जे काही केले, तसेच दहशतवादाविरोधातील आमच्या संयुक्त लढ्यात दिलेल्या मदतीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.”
इस्रायल पुरस्कार हा इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान असून, परंपरेने विज्ञान, कला आणि मानवविद्या अशा क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी इस्रायली नागरिकांना दिला जातो. शांतता श्रेणीत हा पुरस्कार यापूर्वी कधीही देण्यात आलेला नव्हता. जुलै 2025 मध्ये, इस्रायलने पुरस्काराच्या नियमांमध्ये सुधारणा करून हा सन्मान परदेशी नागरिकांनाही देता येईल, अशी तरतूद केली. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. ट्रम्प हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाला उपस्थित राहू शकतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही त्या समारंभात सहभागी होण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode