
इस्लामाबाद , 31 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये राजकीय गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच माजी पंतप्रधान इमरान खान यांची भेट घेण्यासाठी आदियाला तुरुंगाबाहेर आंदोलन करणाऱ्या त्यांच्या बहिणींविरोधात मध्यरात्रीनंतर कारवाई करण्यात आली आहे. इमरान खान यांची बहीण अलीमा खान यांना अटक करण्यात आली आहे.इतकेच नव्हे तर डिसेंबरमधील कडाक्याच्या थंडीत इमरान खान यांच्या समर्थकांवर पाण्याचे फवारे मारण्यात आले होते तर खान यांच्या समर्थकांना तुरुंगाच्या बाहेरही पोहोचू दिले जात नाही.
न्यायालयाने प्रत्येक मंगळवारी इमरान खान यांना त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना भेटण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसारच इमरान यांच्या बहिणी त्यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. मात्र, भेट नाकारल्यानंतर खान यांच्या बहिणींनी तुरुंगाबाहेर धरना आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. आणि त्यांना अटक केली. अटकेदरम्यान केवळ अलीमा खान यांच्या अटकेचे फोटो समोर आले आहेत. अटकेच्या वेळी अलीमा खान यांनी आसिम मुनीर यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. त्या म्हणाल्या की, मुनीर कितीही अत्याचार करू देत, लवकरच इमरान खान यांच्यासाठी लोक रस्त्यावर उतरतील.
अलीमा खान म्हणाल्या, “आम्ही या देशाचे नागरिक आहोत, इथे राहण्याचा आमचा हक्क आहे. हा देश आमचा आहे. २५ कोटी लोकांना देशाबाहेर काढता येणार नाही. जर यांची इच्छा असेल तर हा देशही विकून टाका — त्यांनी ते विकायला सुरुवातही केली आहे. आम्ही इमरान खान यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत. इंशाअल्लाह, लवकरच लोक रस्त्यावर उतरतील आणि मग कोणताही पर्याय उरणार नाही.”
त्या पुढे म्हणाल्या,“आमच्याकडे जाण्यासाठी कोणतेही न्यायालय उरलेले नाही आणि येथे कायद्याचे राज्यही राहिलेले नाही. हे लोक रोजच कायदे तोडत आहेत. इंशाअल्लाह, लोक स्वतःच आपला कायदा पुन्हा प्रस्थापित करतील.”इमरान खान यांच्या बहिणींव्यतिरिक्त पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे मोठ्या संख्येने समर्थकही आदियाला तुरुंगाबाहेर जमा झाले होते. यावेळी इमरान समर्थकांनी आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इमरान समर्थकांनी सांगितले की,“ज्या प्रकारे आमचे नेते तुरुंगात ठामपणे उभे आहेत, त्याच प्रकारे आम्हीही त्यांच्या कुटुंबासोबत इथे तुरुंगाबाहेर त्यांच्या समर्थनार्थ उभे आहोत.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode