
नांदेड, 31 डिसेंबर (हिं.स.)सतत पाच वर्षांपासून स्वच्छतेमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मध्यप्रदेशातील इंदूर शहराच्या महापौरांच्या हस्ते नववर्षाच्या प्रारंभी गुरुवार १ जानेवारी रोजी मनपा निवडणूकीसाठी भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन होणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह भाजपातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
येथील कुसुम सभागृहात गुरुवार १ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण राहणार असून, अखिल भारतिय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष व इंदूर नगरीचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांच्या हस्ते भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खा.डॉ. अजित गोपछडे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्य जाहीरनामा समिती प्रमुख माधवराव भांडारी, मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आमदार उपस्थित राहणार आहेत.
या जाहीरनाम्यात खा. अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठ वर्षात शहरात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतानाच भविष्यातील संकल्पही व्यक्त करण्यात आले आहेत. ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’ असे या जाहीरनाम्याचे शिर्षक असून, ‘आम्ही जिंकणारच!’ ही टॅगलाईन आहे. भाजपाच्या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यास भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर व जाहीरनामा प्रमुख संतोष पांडागळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis