
नवी दिल्ली , 31 डिसेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (30 डिसेंबर) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाल्याच्या वृत्तांबाबत चिंता व्यक्त केली होती. यावर आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी भारतावर टीका केली आहे. युक्रेनने हे आरोप फेटाळून लावत सांगितले आहे की त्यांनी असा कोणताही हल्ला केलेला नाही.दरम्यान, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. झेलेन्स्की म्हणाले की, भारतासह काही देश पुतिन यांच्या निवासस्थानावरील कथित हल्ल्याचा निषेध करत आहेत, मात्र आमच्या मुलांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत त्यांनी कधीही काहीच बोलले नाही.
वृत्तानुसार, एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत झेलेन्स्की यांनी सांगितले, “प्रामाणिकपणे सांगायचे तर भारत, यूएई आणि काही इतर देशांनी पुतिन यांच्या निवासस्थानावरील आमच्या कथित ड्रोन हल्ल्याचा निषेध केला, हे गोंधळात टाकणारे आणि वाईट आहे, कारण असा हल्ला प्रत्यक्षात कधीच झाला नाही.” ते पुढे म्हणाले की, “इतक्या काळापासून रशिया आमच्या मुलांवर हल्ले करत आहे आणि लोकांना ठार मारत आहे, मात्र याचा निषेध कोणीही करत नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर हे मला भारताकडूनही ऐकायला मिळाले नाही, तसेच यूएईकडूनही नाही.”
रशियाने 29 डिसेंबर रोजी दावा केला होता की युक्रेनने 91 ड्रोनद्वारे नोवगोरोड प्रांतातील राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वर एका पोस्टद्वारे म्हटले होते की, पुतिन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या बातम्यांमुळे ते अत्यंत चिंतित आहेत. त्यांनी असेही नमूद केले की, शत्रुत्व संपवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न हा सर्वोत्तम मार्ग आहे. तसेच, शांततेच्या प्रयत्नांना बाधा पोहोचवू शकतील असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी सर्व पक्षांना केले होते.
दरम्यान, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री सिबिहा यांनी सांगितले की, भारत, यूएई आणि पाकिस्तान यांच्या प्रतिक्रियांमुळे कीव निराश आणि चिंतित आहे. ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये सिबिहा यांनी म्हटले की, जवळपास एक दिवस उलटून गेला असला तरी रशियाने पुतिन यांच्या निवासस्थानावर झाल्याच्या कथित हल्ल्याबाबत अद्याप कोणताही विश्वासार्ह पुरावा सादर केलेला नाही, आणि ते तसे करणारही नाहीत. कारण असा कोणताही पुरावा अस्तित्वातच नाही. असा कोणताही हल्ला झालेलाच नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode