
बीजिंग, 4 डिसेंबर (हिं.स.)।चीनमध्ये भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला आहे. चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने (सीईएनसी ) माहिती दिली की ४ डिसेंबर रोजी देशाच्या उत्तर-पश्चिम भागातील शिनजियांग प्रदेशात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा जोर इतका होता की लोक घाबरून घराबाहेर पळाले. शिनजियांग हा किर्गिझस्तानच्या सीमेजवळील प्रदेश आहे.
सीईएनसी च्या माहितीनुसार, भूकंप किर्गिझस्तान–शिनजियांग सीमेजवळील अक्की काउंटीच्या परिसरात स्थानिक वेळेनुसार दुपारी ३:४४ वाजता झाला आणि त्याचे केंद्र जमिनीपासून १० किलोमीटर खोल होते. ज्यामुळे आफ्टरशॉकचा धोका कायम राहतो. सरकारी माध्यमांच्या मते, स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४:३४ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूची किंवा इमारती कोसळल्याची माहिती मिळालेली नव्हती. यापूर्वी २ डिसेंबरला देखील ३.९ तीव्रतेचा आणखी एक भूकंप या भागात १० किमी खोलीवर झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode