
इस्लामाबाद , 4 डिसेंबर (हिं.स.)। पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आपला विस्तार वेगाने वाढवत आहे. सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की अलीकडेच या संघटनेच्या महिला विंग ‘जमात-उल-मोमिनात’ मध्ये ५,००० पेक्षा जास्त महिलांची भरती करण्यात आली आहे. त्याचबरोबर या महिलांना कट्टरपंथी बनवण्याचे कामही सुरू आहे.
एका सोशल मीडिया पोस्टमध्ये जैश प्रमुख मसूद अजहरने सांगितले की महिला विंगमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि आता संघटनेला वेगवेगळ्या जिल्ह्यांत युनिट्स उभारण्याची गरज भासू लागली आहे. अजहरने पोस्टमध्ये लिहिले, “हे अल्लाची मेहेरबानी आहे की काही आठवड्यांतच ५,००० हून अधिक महिला संघटनेत सामील झाल्या आहेत. अनेक महिलांनी सांगितले की भरती होताच त्यांच्या मनःस्थितीत बदल झाला आणि त्यांना आयुष्याचा उद्देश समजला. आता त्या मिळून जिल्हा पातळीवर युनिट्स तयार करतील. प्रत्येक जिल्ह्यात एक व्यवस्थापक असेल आणि काम वाटून दिले जाईल.”
जमात-उल-मोमिनातची स्थापना मसूद अजहरने ८ ऑक्टोबर रोजी जैशच्या मुख्यालयात केली होती. त्यानंतर या विंगमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे. या भरती मोहिमेद्वारे सबहावलपूर, मुल्तान, सियालकोट, कराची, मुजफ्फराबाद आणि कोटली येथील महिलांना या दहशतवादी संघटनेत सामावून घेतले जात आहे. मसूद अजहरची बहीण सादिया अजहर ही जमात-उल-मोमिनातची प्रमुख आहे. ती दहशतवादी यूसुफ अजहरची पत्नीदेखील आहे. यूसुफ अजहरला भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरदरम्यान ठार केले होते. या महिला दहशतवादी विंगमधील आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे अफीरा, जी पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड उमर फारूकची पत्नी आहे. उमर फारूक एका चकमकीत ठार झाला होता.
रिपोर्टनुसार महिलांना जमात-उल-मोमिनातमध्ये भरती करून त्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात आहे. या ऑनलाइन क्लासेस ४० मिनिटांचे असतात आणि प्रत्येक प्रशिक्षणार्थीला ५०० रुपये भरावे लागतात. या संघटनेचा उद्देश महिलांना कट्टरपंथी बनवून आयएसआयएस, हमास आणि LTTEसारख्या आत्मघाती हल्ल्यांसाठी महिला दहशतवादी ब्रिगेड तयार करणे आहे.
जमात-उल-मोमिनात गेल्या महिन्यात दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्टनंतर विशेषतः चर्चेत आला होता. या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता. तपासात असेही आढळले की फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त झाल्यानंतर अटक केलेली डॉ. शाहीन सईद ही जैशच्या दहशतवादी विंगशी जोडलेली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode