
वॉशिंग्टन , 5 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी फिल्ड मार्शल सैयद आसीम मुनीर यांची देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असेल. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आर्मी चीफ आणि चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस – या दोन्ही पदांसाठी पाठवलेल्या शिफारशीला राष्ट्राध्यक्षांनी मंजुरी दिली. राष्ट्रपती भवनाने एक्सवर पोस्ट करून ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली. याच दरम्यान, ४० हून अधिक अमेरिकन खासदारांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांना पत्र लिहून मागणी केली आहे की पाकिस्तानचे आर्मी चीफ आसीम मुनीर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्हिसा बंदी आणि मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात यावी.
अमेरिकन खासदारांचे म्हणणे आहे की, आसीम मुनीर यांच्या नियंत्रणाखालील पाकिस्तानी सरकार दडपशाही धोरणे राबवत आहे. नागरिक समाजाला चिरडले जात आहे. सैन्य शासनाला आव्हान देणारी प्रत्येक आवाज दडपली जात आहे.या दडपशाहीत अनेक उच्चस्तरीय अधिकारी सहभागी आहेत. खासदारांनी प्रश्न उपस्थित केला की अशा लोकांवर अमेरिकेने आजवर कोणतीही कठोर कारवाई का केली नाही? त्यांनी या अधिकाऱ्यांच्या अमेरिकेत प्रवेशावर पूर्णपणे प्रतिबंध लावण्याची मागणी केली आहे. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये प्रमिला जयपाल, रशीदा तालिब, ग्रेग कैसर यांसारखे 44 प्रभावी खासदार समाविष्ट आहेत.
हे पत्र अशा वेळी आले आहे जेव्हा अलीकडेच पाकिस्तानच्या संविधानात असा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे आर्मी चीफ आसीम मुनीर यांना अमर्यादित अधिकार देण्यात आले आहेत. खासदारांनी पत्रात नमूद केले आहे की, पाकिस्तानातील हुकूमशाहीविरोधात बोलणाऱ्या अमेरिकन नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्या, छळ, हिंसा सहन करावी लागत आहे.त्यांना कोणत्याही कारणाशिवाय मनमानीपणे ताब्यात ठेवले जात आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे उल्लंघन आहे. लोकशाही संस्थांना आणि मूलभूत स्वातंत्र्यांना पद्धतशीरपणे नष्ट केले जात आहे. खासदारांनी म्हटले आहे की अमेरिका–पाकिस्तान भागीदारी महत्वाची आहे, परंतु ती मानवाधिकार, लोकशाही शासन आणि कायद्याचे राज्य यांसारख्या मूल्यांवर आधारित असावी.
खासदारांनी या पात्रात काही विशिष्ट घटनांचा उल्लेखही केला ज्यामध्ये व्हर्जिनियातील खोजी पत्रकार अहमद नूरानी यांना सतत धमक्या मिळत आहेत. त्यांच्या एका रिपोर्टनंतर इस्लामाबादमध्ये त्यांच्या भावांना घरातून उचलून नेऊन मारहाण करण्यात आली आणि एक महिन्याहून अधिक ताब्यात ठेवले गेले. संगीतकार सलमान अहमद यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अमेरिका आणि पाकिस्तान दोन्हीकडे धमक्या देण्यात आल्या. पत्रकारांना पाकिस्तानमध्ये छळले जाते, अपहरण केले जाते किंवा देश सोडण्यास भाग पाडले जाते.पत्रात खासदारांनी विशेषतः बलुचिस्तानचा उल्लेख करत म्हटले आहे कि महिलांवर, धार्मिक अल्पसंख्याकांवर आणि दुर्लक्षित समुदायांवर अत्यंत क्रूर हिंसा आणि देखरेख लादली जात आहे.
हे सर्व नागरिक समाजाला चिरडण्याच्या सुनियोजित मोहिमेचे उदाहरण आहे. विरोधी नेत्यांना बिना-चार्ज अनिश्चितकाळ ताब्यात ठेवले जाते. सामान्य नागरिकांना सोशल मीडिया पोस्टच्या आधारेही अटक केली जाते. खासदारांचे म्हणणे आहे की पाकिस्तानची ही अधिनायकवादी व्यवस्था सततच्या दडपशाहीच टिकून आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode