‘अखंड 2’ च्या प्रदर्शनाची नवीन तारीख लवकरच घोषित होणार
मुंबई, 5 डिसेंबर, (हिं.स.)। तेलुगू सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अखंड 2’ चे प्रदर्शन अचानक स्थगित करण्यात आले आहे. 5 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार होता; मात्र रिलीजच्या काही
अखंड


मुंबई, 5 डिसेंबर, (हिं.स.)। तेलुगू सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अखंड 2’ चे प्रदर्शन अचानक स्थगित करण्यात आले आहे. 5 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार होता; मात्र रिलीजच्या काही तास आधीच निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की चित्रपटाचे प्रदर्शन अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलले आहे.

2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अखंड’ ने बॉक्स ऑफिसवर कमाई करत प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे त्याच्या सीक्वेलविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. अशा वेळी शेवटच्या क्षणी प्रदर्शन रद्द होणे हे चाहत्यांसाठी निराशाजनक ठरले आहे.

निर्मात्यांचे अधिकृत निवेदन

चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर भावनिक स्वरात लिहिले आहे, “जड अंतःकरणाने आम्हाला कळवावे लागत आहे की, अखंड 2 अपरिहार्य कारणांमुळे निर्धारित तारखेला प्रदर्शित होऊ शकणार नाही. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, हे आम्हाला माहीत आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.”

यापूर्वी देखील चित्रपटाचा प्रीमियर शो अचानक रद्द करण्यात आला होता, ज्यामुळे प्रेक्षकांमधील चिंता आणखी वाढली.

कोर्टाच्या आदेशामुळे प्रदर्शन स्थगित

मिळालेल्या माहितीनुसार, अखंड 2चे प्रदर्शन मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टाळण्यात आले आहे. इरोस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने चित्रपटाच्या स्क्रीनिंगवर तात्पुरती बंदी लावली आहे.

हा संपूर्ण वाद जुन्या विवादाशी संबंधित आहे. या प्रकरणात न्यायालयाने इरोसच्या बाजूने निर्णय देत सुमारे 28 कोटी रुपये (14% व्याजासह) देण्याचे आदेश दिले होते. ही थकबाकी पूर्ण होईपर्यंत चित्रपट प्रदर्शित करू नये, असा आदेश न्यायालयाने जारी केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande