
मुंबई, 5 डिसेंबर, (हिं.स.)। ॲपलने आपल्या महत्त्वाच्या आरोग्य सुविधांपैकी एक असलेली हायपरटेन्शन नोटिफिकेशन्स सुविधा भारतात सुरू केल्याची घोषणा केली. सप्टेंबरमध्ये watchOS 26 अपडेटसोबत प्रथम उपलब्ध झालेल्या या फीचरमुळे ॲपल वॉच वापरकर्त्यांना त्यांच्या हृदयाच्या डेटामधील दीर्घकालीन बदल आढळल्यास उच्च रक्तदाबाची शक्यता असलेली सूचना मिळू शकते. या सुविधेअंतर्गत घड्याळ वापरकर्त्याचा ३० दिवसांचा हृदयविषयक डेटा तपासते आणि रक्तवाहिन्यांवरील दाबाचे नमुने विश्लेषित करते. यामुळे हायपरटेन्शनचा धोका ओळखण्यास मदत होते.
ही सुविधा वापरण्यासाठी ॲपल वॉच सीरीज 9 किंवा त्यानंतरची मॉडेल्स किंवा ॲपल वॉच अल्ट्रा 2 आणि त्यानंतरची आवृत्ती आवश्यक आहे. वॉचवर watchOS 26 तर आयफोनवर iOS 26 ची आवृत्ती असणे बंधनकारक असून आयफोन 11 किंवा त्यानंतरचे मॉडेल आवश्यक आहे. तसेच वापरकर्त्याचे वय २२ वर्षांपेक्षा जास्त, गर्भवती नसल्याची आणि आधी उच्च रक्तदाबाचे निदान नसल्याची नोंद करावी लागते. हायपरटेन्शन नोटिफिकेशन्स सक्षम करण्यासाठी आयफोनवरील हेल्थ अॅपमध्ये ‘हेल्थ चेकलिस्ट’ विभागातून हे फीचर सुरू करता येते.
ॲपलच्या मते जगभरातील १.३ अब्जांहून अधिक प्रौढांना हायपरटेन्शनची समस्या असल्याचे अनुमान आहे; परंतु याची लक्षणे स्पष्ट दिसत नसल्याने अनेकांना याची कल्पनाही नसते. या स्थितीत ॲपल वॉचचे हे नवीन फीचर उपयोगी ठरू शकते. वॉचचा ऑप्टिकल सेंसर हृदयाचे ठोके, रक्तवाहिन्यांची प्रतिक्रिया आणि इतर संबंधित संकेत यांचा अभ्यास करून पार्श्वभूमीत सतत डेटा विश्लेषित करतो. गेल्या ३० दिवसांत सतत हायपरटेन्शनचे संकेत आढळल्यास वॉच वापरकर्त्याला सूचना पाठवते. अशा अलर्टनंतर वापरकर्त्यांनी त्वरित डॉक्टरांकडे जाऊन प्रत्यक्ष रक्तदाब मोजणे आवश्यक असल्याचे ॲपलने स्पष्ट केले आहे.
सूचना मिळाल्यावर ॲपल वॉच वापरकर्त्यांना ‘ब्लड प्रेशर लॉग’ सेट करण्यासाठी प्रोत्साहन देते आणि सात दिवस नियमित रक्तदाब मोजण्यासाठी तृतीय पक्षाच्या ब्लड प्रेशर कफचा वापर करण्याचा सल्ला देते. या प्रणालीमुळे वापरकर्त्यांना आपली आरोग्यस्थिती समजून घेणे आणि वेळेत उपचार सुरू करणे सोपे होते. तथापि, ॲपलने स्पष्ट केले आहे की हे फीचर कोणत्याही प्रकारचे निदान, उपचार किंवा वैद्यकीय व्यवस्थापनासाठी तयार केलेले नाही. तसेच हायपरटेन्शन असलेल्या सर्व वापरकर्त्यांना यावर सूचना मिळेलच असे नाही. याशिवाय ॲपल वॉच हृदयविकाराचा झटका ओळखू शकत नाही, त्यामुळे छातीत दुखणे किंवा दाब जाणवण्यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित आपत्कालीन सेवांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्याच्या आणि दीर्घकालीन आजारांचे जोखमीतील नमुने ओळखण्याच्या दृष्टीने ॲपल वॉचच्या या नवीन सुविधेला महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतात ही सुविधा सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात वापरकर्त्यांना संभाव्य आरोग्यधोका लवकर ओळखण्याची संधी मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule