

मुंबई, 5 डिसेंबर (हिं.स.)। भारतात वाढत्या ई-वेस्टच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत गोदरेज एंटरप्रायझेस समूहाच्या अप्लायन्सेस व्यवसायाने ‘भारत विरुद्ध ई-कचरा’ उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून ‘द ई-वेस्ट दॅट वी ईट, बट शुडन्ट’ ही व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. अयोग्य पद्धतीने हाताळल्या जाणाऱ्या ई-वेस्टमुळे जमिनीत आणि पाण्यात मिसळणारे विषारी घटक अखेर आपल्या अन्नसाखळीत कसे शिरतात, याकडे लक्ष वेधण्यासाठी लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या प्रतिमा आणि त्यात मिसळलेल्या विषारी ई-वेस्ट घटकांची व्हिज्युअल रूपके या मोहिमेत वापरण्यात आली आहेत. ही मोहीम यावेळी थेट शालेय विद्यार्थ्यांवर केंद्रित असून जबाबदार ई-वेस्ट विल्हेवाटीबाबत तरुण पिढीमध्ये सजगता निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात वित्त वर्ष 2024-25 मध्ये सुमारे 1.3 दशलक्ष मेट्रिक टन ई-वेस्ट निर्माण झाले आहे. जागतिक स्तरावरही परिस्थिती गंभीर असून यूएनच्या चौथ्या ग्लोबल ई-वेस्ट मॉनिटर अहवालानुसार दरवर्षी 2.6 दशलक्ष टनांनी ई-वेस्ट वाढत आहे. 2030 पर्यंत हा आकडा तब्बल 82 दशलक्ष टनांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2022 मध्ये जगभरात 62 अब्ज किलो ई-वेस्ट निर्माण झाले, परंतु त्यापैकी केवळ 22.3% एवढेच अधिकृतरीत्या संकलित होऊन पर्यावरणपूरक पद्धतीने पुनर्वापरित करण्यात आले.
अव्यवस्थित ई-वेस्टचे विषारी दुष्परिणाम केवळ फेकलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या ढिगांपुरते मर्यादित राहत नाहीत. चुकीच्या पद्धतीने पुनर्वापरित उपकरणांतील धोकादायक रसायने जमिनीत व भूजलात झिरपून अन्नसाखळीत पोहोचतात आणि मानवाच्या आरोग्याबरोबरच परिसंस्थेलाही गंभीर धोका निर्माण करतात. या पार्श्वभूमीवर गोदरेजने गेल्या काही वर्षांत ‘भारत विरुद्ध ई-कचरा’ उपक्रमांतर्गत 1 लाख टनांपेक्षा जास्त ई-वेस्ट संकलित करून पुनर्वापरित केले असून पाच लाखांहून अधिक नागरिकांना जबाबदार ई-वेस्ट विल्हेवाटीबाबत शिक्षित केले आहे.
या वचनबद्धतेला पुढे नेत कंपनीने सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओंची मालिका प्रसिद्ध केली आहे. यात लोकप्रिय खाद्यपदार्थांमध्ये मिसळलेले ई-वेस्ट घटक दाखवणारी प्रभावी दृश्य रूपके सादर केली असून लोकांना ई-वेस्ट जबाबदारीने कसा टाकावा यासाठी मार्गदर्शक डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभरातील 200 पेक्षा जास्त शाळांमध्ये जनजागृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून लाइफ-साइज्ड ‘E-waste Table’ इंस्टॉलेशन्स तयार केली आहेत. फेकून दिलेल्या उपकरणांच्या भागांपासून साकारलेली ही इंस्टॉलेशन्स आणि ‘टॉक्सिक टाकोस’ व ‘सर्किट बोर्ड केक’सारखी प्रभावी 3D मॉडेल्स विद्यार्थ्यांना ई-वेस्टचा धोका अत्यंत स्पष्टपणे समजावून सांगतात.
उपक्रमाबद्दल बोलताना गोदरेज एंटरप्रायझेस समूहाच्या अप्लायन्सेस व्यवसायाचे बिझनेस हेड आणि ईव्हीपी कमल नंदी यांनी नागरिकांनी ई-वेस्ट फुटप्रिंटचा पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित केली. “देश, समाज आणि पर्यावरणासाठी प्रगतीचा मार्ग दाखवणे हे आमचे मुख्य मूल्य आहे. या मोहीमेच्या माध्यमातून जबाबदार ई-वेस्ट विल्हेवाटीला चालना देणे हा आमचा उद्देश आहे,” असे ते म्हणाले. तर अप्लायन्सेस विभागाच्या मार्केटिंग प्रमुख स्वाती राठी यांनी डिजिटल युगात वाढणाऱ्या तरुण पिढीला योग्य सवयी लावण्याचे महत्त्व स्पष्ट केले. “अन्नाच्या भाषेतील दृश्य रूपके त्यांच्या आरोग्याशी ई-वेस्टचा संबंध थेट जोडतात आणि अधिक सजग होण्यासाठी प्रेरित करतात,” असे त्यांनी सांगितले.
हुल्लाडेकच्या सहकार्याने राबवलेल्या या पॅन-इंडिया स्कूल अॅक्टिवेशन्स उपक्रमाला सोशल मीडिया अॅम्प्लिफा आणि डिजिटल व्हिडिओ प्रमोशनचा आधार मिळत असून अॅडफॅक्टर्स पीआर आणि Tribes Communication यांनी या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule