
मुंबई, 5 डिसेंबर, (हिं.स.)। पोलिसांची वर्दी सांभाळणं हे अर्थात अभिमानास्पद आहे. आणि हा अभिमान अभिनेता सुबोध भावेलाही जपावा असं नेहमी वाटायचं. बऱ्याच मुलाखतींमध्ये पोलीस व्हायचं स्वप्न होतं असं ते म्हणाले आहेत. आणि त्याचं हे स्वप्न ते अभिनय क्षेत्रात अभिनयाच्या वाटे पूर्ण करत आहेत. हो. आगामी 'कैरी' या मराठी चित्रपटात सुबोध भावे पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत. पोलिसांच्या भूमिकेत काम करायचं स्वप्न ते या चित्रपटाद्वारे पूर्ण करत आहेत. फॉरेन पोलिसांच्या भूमिकेत ते या चित्रपटात दिसले. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. ट्रेलरमधील त्यांची ही करारी भूमिका चाहत्यांना चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची उत्सुकता वाढवत आहे.
‘कैरी’ सिनेमातील भूमिकेबाबत बोलताना सुबोध भावे म्हणाले की, “यंदा हिवाळ्यातच आपणा सर्वांना कैरी चाखायला मिळणार आहे. आणि ही कैरी आंबट-गोड वा नेमकी कशी असणार हे मात्र १२ नोव्हेंबरला कळेल. कारण माझा ‘कैरी’ हा आगामी सिनेमा भेटीस येतोय. आणि मी या चित्रपटासाठी स्वतः खूप उत्सुक आहे. आजवर मी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. पण पोलिसांची भूमिका माझ्या अगदी जवळची आहे. कारण अभिनयात नसतो तर पोलीस व्हायचं हे माझं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न मी या चित्रपटातून पूर्ण करत आहे. चित्रपटात सहकलाकारांसह काम करताना खूप मज्जा आली.
‘कैरी’ चित्रपटात सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. आणि चित्रपटाचं शुटिंग कोकणातील नयनरम्य वातावरणात पार पडलं आहे.
‘कैरी' या चित्रपटाची निर्मिती ‘९१ फिल्म स्टुडिओज’ अंतर्गत झाली आहे. ‘लोच्या झाला रे’ आणि ‘शेर शिवराज’ या दोन ब्लॉकबस्टर व्यावसायिक अशा मराठी चित्रपटांनंतर ते ‘कैरी’ हा तिसरा सिनेमा घेऊन आले आहेत. शिवाय ‘कैरी’ हा सिनेमा इन असोसिएशन विथ ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेंमेंट’चा आहे. तर ‘कैरी’ चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'कैरी'चे लेखन स्वरा मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटाला निषाद गोलांबरे आणि पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. तर पार्श्वसंगीताची जबाबदारी साई पियूष यांनी सांभाळली. तर चित्रपटाचे छायांकन प्रदीप खानविलकर यांचे आहे. आणि चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी मनीष शिर्के यांनी सांभाळली आहे. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर