

मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.)। प्रीमियम मोटरसायकल निर्माता ट्रायम्फ मोटरसायकल इंडिया ने आपल्या लोकप्रिय स्क्रॅम्बलर ४०० एक्स मॉडेलसाठी वर्षअखेर आकर्षक ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने संभाव्य ग्राहकांसाठी 13,300 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरी पॅकेजची घोषणा केली असून हा लाभ फक्त 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत मोटरसायकल खरेदी करणाऱ्या नवीन ग्राहकांनाच मिळणार आहे.महत्त्वाचे म्हणजे, सध्या स्क्रॅम्बलर ४०० एक्सचे मालक या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
या स्कीमअंतर्गत मिळणाऱ्या अॅक्सेसरीमध्ये लोअर इंजिन बार, मडगार्ड किट, छोटी फ्लायस्क्रीन, टँक पॅड, लगेज रॅक किट आणि अधिकृत ट्रायम्फ टी-शर्टचा समावेश आहे. कंपनीच्या मते या सर्व अॅड-ऑन्सची एकत्रित किंमत 13,300 रुपये असून वर्षअखेरपर्यंत हे पॅकेज ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दिले जाणार आहे. मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत 2.68 लाख रुपये आहे आणि सध्या या किंमतीसोबत अॅक्सेसरी पॅकेज मोफत दिले जात आहे.
ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 X ही कंपनीची एंट्री-लेव्हल स्क्रॅम्बलर बाइक आहे, जी रस्त्यावर चालवण्यासोबत हलक्या ऑफ-रोडिंगसाठी डिझाइन करण्यात आली आहे. या मॉडेलमध्ये 398 cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले असून ते 8,000 rpm वर 39.5 bhpची शक्ती आणि 6,500 rpm वर 37.5 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
मोटरसायकलमध्ये 19-इंच फ्रंट आणि 17-इंच रियर व्हील्स असून त्यांना ब्लॉक-पॅटर्न टायर जोडले आहेत. फीचर्समध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्विचेबल ड्युअल-चॅनल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, फुल-LED लाईटिंग आणि USB Type-C चार्जिंग पोर्ट यांचा समावेश आहे. वर्षअखेरच्या ऑफरसह Scrambler 400 X ग्राहकांसाठी आणखी आकर्षक पर्याय बनली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule