
हैदराबाद, 8 डिसेंबर (हिं.स.)।तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी हैदराबादमधील एका रस्त्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तेलंगणा रायझिंग ग्लोबल समिट दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत येण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. मात्र या प्रस्तावामुळे सीएम रेवंत रेड्डी विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. तेलंगणा भाजपने या प्रस्तावावर टीका करत त्यांची खिल्ली उडवली आहे.
तेलंगणाचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी या प्रस्तावावर टीका करत हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ करण्याची मागणी पुन्हा केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “हैदराबादचे नाव बदलून परत भाग्यनगर करा. जर काँग्रेस सरकारला नाव बदलायची एवढीच घाई असेल, तर त्यांनी असे काही करावे ज्याला खरा इतिहास आणि अर्थ आहे. आपण किती विचित्र परिस्थितीत जगत आहोत. एकीकडे के. टी. रामाराव केसीआरच्या एआय पुतळ्यांची निर्मिती करण्यात व्यस्त आहेत, आणि ते अजूनही जिवंत आहेत; तर दुसरीकडे रेवंत रेड्डी ट्रेंडमध्ये असणाऱ्या लोकांच्या नावावर रस्त्यांची नावे ठेवत आहेत. या सर्वांमध्ये भाजपा ही एकमेव पक्ष आहे जी खऱ्या लोकांच्या प्रश्नांवर सरकारला कठोर प्रश्न विचारत आहे आणि आंदोलनांद्वारे त्यांना पुढे आणत आहे.”
मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सुचवले आहे की हैदराबादातील अमेरिकन महावाणिज्य दूतावासाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नाव ‘डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू’ ठेवावे. तसे झाले, तर जगात पहिल्यांदाच एखाद्या देशात अमेरिकेच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षाच्या नावाने अशा प्रकारे रस्त्याचे नामकरण होईल. दरम्यान, हैदराबादमध्ये शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या राजकारण्यांच्या आणि जागतिक कंपन्यांच्या नावावर रस्त्यांची नावे ठेवण्याची परंपरा आहे. उदाहरणार्थ ‘गुगल स्ट्रीट’, जे हैदराबादमधील गुगलच्या मजबूत उपस्थितीचे प्रतीक आहे. तसेच तिथे ‘मायक्रोसॉफ्ट रोड’ आणि ‘विप्रो जंक्शन’ही आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode