
बोगोटा, 8 डिसेंबर (हिं.स.)।कोलंबियाच्या ईशान्य भागात दोन पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येसाठी कोलंबिया सरकारने नेशनल लिबरेशन आर्मी (एनएलए) या मार्क्सवादी गुरिल्ला संघटनेला जबाबदार ठरवले आहे. ही संघटना 1960 च्या दशकापासून कोलंबियामध्ये सक्रिय आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या हत्येची तीव्र निंदा केली आहे.
एक्सवर लिहिताना पेट्रो म्हणाले, “कुकुटा येथे एका पोलिस अधीक्षक आणि उपअधीक्षकाची हत्या झाल्याची मी कडक निंदा करतो.” तसेच त्यांनी कोलंबिया–व्हेनेझुएला सीमेवर सक्रिय असलेल्या लष्करी लढवय्यांनाही इशारा दिला आहे.
कोलंबियाच्या राष्ट्रीय पोलिसांचे संचालक जनरल विल्यम ओस्पिना यांच्या मते, नॉर्टे दे सॅंटांडर विभागात दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. पहिल्या हल्ल्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या हल्ल्यात दोन सैनिक जखमी झाले आहेत. कोलंबियन मीडियामध्ये स्फोटाच्या घटनांचे फोटोही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत. प्राथमिक तपासानुसार, पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईनंतर एनएलएने हा हल्ला केला आहे.
एनएलएची स्थापना 1964 मध्ये झाली होती. पेट्रो सरकार एनएलए सोबत शांतता चर्चेचा प्रयत्न करत होते, परंतु वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दहशतवादी हल्यांनंतर ही चर्चा मध्येच थांबली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode