
नांदेड, 8 डिसेंबर (हिं.स.)।
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच गोवंशीय जनावरे आणि वाहने असा एकूण ९.२५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे नांदेड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
नांदेड जिल्ह्यात अवैध मार्गाने गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करीत पाच गोवंशीय जनावरे आणि वाहने असा एकूण ९.२५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
उपनिरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाकडून नांदेड शहर आणि जिल्ह्यात गस्त घालत असताना, बोंढार हवेली परिसरात गुप्त माहितीदारामार्फत पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली.
गोवंश कत्तलीसाठी अवैधरीत्या वाहतूक करणारी बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच ०२ एफजी ०९७८) आलुपॅज मार्केटकडून गाडेगाव रोडकडे येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचण्यात आला.
पोलिसांनी आलुपॅज मार्केटजवळ छापा टाकून ही बोलेरो पिकअप ताब्यात घेतली. तपासणीअंती वाहनात अवैधरीत्या कोंबून भरलेली पाच गोवंशीय जनावरे आढळून आली. जप्त केलेल्या जनावरांची किंमत अंदाजे ३ लाख २५ हजार ००० रुपये, तर बोलेरो पिकअपची किंमत अंदाजे ६ लाख रुपये, असा एकूण ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपीसह जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आला असून, पोस्टे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis