
मुंबई, 8 डिसेंबर (हिं.स.)। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात जगभरात दररोज नवनवीन क्रांतिकारी घडामोडी घडत आहेत. अशाच एका महत्त्वाच्या घडामोडीमुळे चीन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चीनने विकसित केलेला एक अत्याधुनिक एआय स्मार्टफोन सध्या संपूर्ण टेक विश्वाचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोन केवळ व्हॉइस कमांडवर काम करणारा नाही, तर स्क्रीनवर दिसणारी प्रत्येक गोष्ट वाचून स्वतः निर्णय घेऊ शकतो आणि जणू एखाद्या माणसाप्रमाणे संपूर्ण फोन ऑपरेट करू शकतो.
हा अनोखा डिव्हाइस झेडटीई आणि टिकटॉकची पेरेंट कंपनी असलेल्या बाईटडान्स यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. या प्रोटोटाइप फोनचे नाव नुबिया एम 153 असे असून, तो सध्या चाचणी टप्प्यात आहे. नुकताच या फोनचा एक डेमो चीनमधील एका उद्योजकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला, त्यानंतर अवघ्या काही तासांत या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आणि त्याची चर्चा जगभर सुरू झाली. हा फोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो आणि त्यामध्ये बाईटडान्स चा अत्याधुनिक एआय एजंट ‘Doubao’ वापरण्यात आला आहे.
या एआय फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा सामान्य व्हॉइस असिस्टंटसारखा काम करत नाही. उलट, तो ‘फुल-स्क्रीन कंट्रोल’ असलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स एजंट आहे. म्हणजेच, फोनच्या स्क्रीनवर काय दिसत आहे, कोणते बटण कुठे आहे, कोणती माहिती भरायची आहे – हे सर्व तो स्वतः समजून घेतो. त्यानंतर तो स्वतः अॅप्स उघडतो, फॉर्म भरतो, कॉल करतो, स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे वाचन करतो आणि अनेक स्टेप असलेली कामे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय पूर्ण करतो.
या फोनची कार्यक्षमता दाखवण्यासाठी करण्यात आलेल्या एका डेमोमध्ये एक अत्यंत रोचक प्रयोग करण्यात आला. एका युजरने फक्त एखाद्या हॉटेलच्या बाहेरील भागाचा फोटो काढला आणि “आज रात्रीसाठी हॉटेल बुक कर” अशी कमांड दिली. त्यानंतर एआय फोनने स्वतः त्या फोटोमधील हॉटेल ओळखले, बुकिंग अॅप उघडले, तारीख निवडली, उपलब्ध दर तपासले आणि त्या हॉटेलमध्ये पाळीव प्राणी घेऊन जाण्याची परवानगी आहे का, हे देखील तपासले. काही क्षणांतच संपूर्ण बुकिंग प्रक्रिया फोनने स्वतः पूर्ण केली.
आजपर्यंत जगातील कोणत्याही मोठ्या टेक कंपनीकडे असा एआय असिस्टंट उपलब्ध नाही, जो संपूर्ण स्क्रीन वाचून फोन स्वतःच चालवू शकेल. Apple, Samsung यांसारख्या दिग्गज कंपन्यांकडेही ही क्षमता सध्या तरी उपलब्ध नाही. नुबिया च्या या प्रोटोटाइप फोनने भविष्यातील स्मार्टफोन कसे असतील, याची झलक दाखवून दिली आहे. येत्या काळात असे AI आधारित स्मार्टफोन आपल्यासाठी केवळ संवादाचे साधन न राहता, एक खरे वैयक्तिक डिजिटल सहाय्यक ठरतील आणि मानवी कामाचा मोठा भार स्वतः उचलतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule