कटक टी-20 सामन्यात भारताचा द. आफ्रिकेवर 101 धावांनी विजय
कटक, 9 डिसेंबर (हिं.स.)कटक येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांनी पराभव केला. हार्दिक पंड्याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिके
हार्दिक पंड्या


कटक, 9 डिसेंबर (हिं.स.)कटक येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांनी पराभव केला. हार्दिक पंड्याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ १२.३ षटकांत ७४ धावांतच गारद झाला. अशाप्रकारे भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली, पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने नियमितपणे विकेट गमावल्या आणि त्यांच्या कोणत्याही फलंदाजाला लक्षणीय धावा करता आल्या नाहीत. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी इतकी खराब होती की फक्त चार फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचले. दक्षिण आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक २२ धावा केल्या, तर कर्णधार एडेन मार्करामने १४, ट्रिस्टन स्टब्सने १४ आणि मार्को जॅन्सेनने १२ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली. मनोरंजक म्हणजे, सर्व भारतीय गोलंदाज यशस्वी झाले. या काळात बुमराहने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० बळींचा टप्पाही गाठला आणि अर्शदीपनंतर असा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

तत्पूर्वी हार्दिक पंड्याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकने २८ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या, ज्यामुळे भारताने २० षटकांत सहा बाद १७५ धावा केल्या. हार्दिकशिवाय भारताच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

भारताकडून हार्दिकशिवाय तिलक वर्मा २६, अक्षर पटेल २३, अभिषेक शर्मा १७, कर्णधार सूर्यकुमार यादव १२ आणि शिवम दुबे १० धावा काढल्या. जितेश शर्मा १० धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने तीन, तर लुथो सिपामलाने दोन आणि डोनोवन फरेरा यांनी एक विकेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande