जळगाव, 26 सप्टेंबर (हिं.स.) :शहरातील अयोध्यानगर भागात दरोडेखोरांनी पहाटे घरात घुसून चाकूच्या धाकावर सुमारे ६ तोळे सोने व ४० हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. , दीपक पुंडलिक पाटील (रा. बंगाली फाईल, अयोध्यानगर) हे रेल्वेत तांत्रिक पदावर कार्यरत आहेत. ते पहाटे ५ वाजता नोकरीसाठी घराबाहेर पडले. त्यानंतर अल्पावधीतच चार अज्ञात चोरट्यांनी हातात धारदार शस्त्रे घेऊन त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवत त्यांनी घरातील कपाटे उचकटली व त्यातून सुमारे ६ तोळे सोने दागिने तसेच ४० हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लुटून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला असून घरफोडीप्रकरणी अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर