जळगाववरून धुळ्याकडे येणाऱ्या कारमध्ये अंमलीपदर्थ जप्त
धुळे , 26 सप्टेंबर (हिं.स.) नशेसाठी वापरण्यात येत असलेल्या अंमली पदार्थांची वाहतूक व विक्रीला बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने ड्रग्सची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. जळगाववरून धुळ्याकडे येणाऱ्या कारमधून एमडी ड्रगची तस्करी उघडकीस आली आहे.
जळगाववरून धुळ्याकडे येणाऱ्या कारमध्ये अंमलीपदर्थ जप्त


धुळे , 26 सप्टेंबर (हिं.स.) नशेसाठी वापरण्यात येत असलेल्या अंमली पदार्थांची वाहतूक व विक्रीला बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने ड्रग्सची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. जळगाववरून धुळ्याकडे येणाऱ्या कारमधून एमडी ड्रगची तस्करी उघडकीस आली आहे. धुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १०७ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत केला आहे. या कारवाईत राजस्थान व मालेगाव येथील प्रत्येकी एकास अटक करण्यात आली असून दोघांची चौकशी सुरू आहे.

धुळे पोलिसांना गुप्त माहिती दाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरात एमडी ड्रग्सचा साठा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर संशयित जीजे 16 डीएस 0314 क्रमांकाची कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही आरोपींनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांची नावे सय्यद अतीक सय्यद रफीक (मालेगाव) व मजहर खान युसुफ खान (बासवाडा, राजस्थान) अशी आहेत. झडतीत सय्यद अतीककडून 104 ग्रॅम वजनाचे एमडी पावडर (किंमत रु. 10.40 लाख) मिळाले. तसेच कार, तीन मोबाईल यांसह एकूण रु. 17.51 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, अटक केलेल्या आरोपींनी यापूर्वीही धुळे शहरात एमडी ड्रगची विक्री केल्याची माहिती मिळाली आहे. हे ड्रग प्रामुख्याने उच्चभ्रू लोकांच्या पार्टींमध्ये वापरले जात असल्याचेही प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून, धुळ्यातील संभाव्य खरेदीदार व तस्करीचे नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande