परभणी, 27 सप्टेंबर (हिं.स.)।अफरातफरी करीत 88 लाख 17 हजार रुपये किमतीचा दारुचा साठा लंपास करणार्या चोरट्यांना जिंतूर पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन माल जप्त केला.
प्रभाकर विश्वनाथ घुगे व त्यांचा मुलगा अनिल प्रभाकर घुगे हे दोघे 31 ऑगस्ट रोजी त्यांचा ट्रक क्रमांक एम.एच. 15 जी.व्ही. 1735 या वाहनातून नाशिक येथील सिड्रामसह अन्य कंपन्यांचे 1 कोटी 38 लाख रुपयांचे विदेशी दारुचे बॉक्स नांदेड येथील अलका वाईनशॉप या ठिकाणी पोहोचविण्यासाठी निघाले होते. वाटेतच या दोघांनी इतर साथीदारांच्या मदतीने 88 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल अफरातफर करुन हडप केला व सदरचे वाहन स्वतःहून जिंतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली दराडे या शिवारात हेतुतः पलटी केले. त्यातील विदेशी दारुचे बॉक्स स्थानिक लोकांनी काढून नेले, असा बनाव केला व जिंतूर पोलिस ठाण्यात स्वतः येऊन अपघात झाल्याची खोटी तक्रार दाखल केली.
जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सहाय्यक पोलिस अधिक्षक जीवन बेनिवाल यांच्याकडे तपास सुपूर्त केला. त्यांनी या गुन्ह्यात सखोल अभ्यासपूर्वक तपास केला. घटनास्थळाची पाहणी केली. गोपनिय माहितीच्या आधारे सदर वाहनाचा अपघात झालेलाच नाही, ही माहिती कळाल्याबरोबर ती फिर्याद खोटी असल्याचा निष्कर्ष काढून त्या दिशेने तपास सुरु केला व पुणे भागातील शिक्रापूर येथून प्रभाकर विश्वनाथ घुगे यास ताब्यात घेतले. त्याने पोलिस चौकशीत उडवा उडवीची उत्तरे दिली. सहाय्यक पोलिस अधिक्षक बेनिवाल यांनी तांत्रिक अभ्यास करुन माहिती मिळवून सदरच्या गुन्ह्यात अफरातफर करुन लंपास केलेले दारुचे बॉक्स शोधून काढले व या मुख्य आरोपीस मदत करणार्या तीघा आरोपींकडून 65 लाख 49 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. अनिल शिवाजी चव्हाण (वय 32 रा. मंठा), रविंद्र हरिभाऊ पवार (वय 30 रा. डांबरी ता.जि. जालना) व सचिन अशोक सोळंके (वय 35, रा. तूळजाभवानी नगर वाटू, ता.परतूर) या तीघांना ताब्यात घेतले.
पोलिस अधिक्षक परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक जीवन बेनिवाल, पोलिस उपनिरीक्षक जगदीश मेहेत्रे, अंमलदार गजानन राठोड, विक्रम उकंडे, आकाश काळे, यशवंत वाघमारे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती, जगताप, सुनील अंधारे, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भूजबळ, सिध्देश्वर चाटे, विलास सातपुते, गायकवाड, घुगे, इम्रान, आदीत्य लाकुळे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, जालना येथील पोलिस निरीक्षक पंकज जाधव, गोपाळ गोशीक, प्रभाकर वाघ व रमेश काळे यांनी तपास कार्यात सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis