जळगाव , 27 सप्टेंबर (हिं.स.) - कासोदा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे उत्राण शिवारातील शंकर चौधरी यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत पाच जुगारी ताब्यात घेतले असून ६१६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सपोनि निलेश राजपुत यांना कासोदा गावालगतच्या उत्राण शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोहेकॉ श्रीकांत गायकवाड, पोकॉ योगेश पाटील यांच्या पथकाने छापा टाकण्यात आला असता काही इसम पत्त्यांवर पैशांचा खेळ खेळताना रंगेहात सापडले.
कारवाईत रामचंद्र दगडु कोळी (३०), हेमंत राजु भोई (२५), नारायण सुरेश चौधरी (३३), गोरख धर्मा गोकुळ (४०) यांना ताब्यात घेण्यात आले, तर उत्तम धनराळे हा फरार झाला आहे. त्यांच्याकडून रोख ५,९५० रुपये, १० हजार रुपयांचा मोबाईल व ४५ हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ६१,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोकॉ. दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर