रायगड, 27 सप्टेंबर (हिं.स.)।
उसर (ता. अलिबाग) येथील भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या गेल कंपनीत सव्वा लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीचा प्रकार समोर येताच कंपनीतील सुरक्षेच्या व्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत.
गेल कंपनीचा दुसरा टप्पा – पॉलिमर प्रकल्प – उसर परिसरात गेल्या चार वर्षांपासून सुरू असून, हा प्रकल्प अत्यंत सुरक्षित म्हणून ओळखला जातो. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, राज्य औद्योगिक सुरक्षा दल, आणि प्रवेश तपासणी व्यवस्था असूनही चोरट्यांनी सुरक्षा यंत्रणांना धक्का देत सुमारे ९५ मीटर लांब कॉपर केबल लंपास केली.
ही केबल कंपनीच्या पाईप यार्ड परिसरात ठेवलेली होती. विशेष म्हणजे, यापूर्वीही चोरीच्या घटना वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या होत्या, मात्र कंपनी प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप आता होत आहे. यामुळे कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.या घटनेच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक नामदेव आंगज तपास करत असून, अद्याप चोरट्यांचा काहीही सुगावा लागलेला नाही. चोरी करणारे मोकाट फिरत आहेत, तर कामगारांची तपासणी होऊनही दोषी हाती न लागल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
या प्रकारामुळे गेल प्रकल्पासारख्या महत्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस चोरट्यांचा लवकर शोध लावतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके