जळगावातील घरफोडीचा छडा; चौघांना अटक
जळगाव, 27 सप्टेंबर (हिं.स.) रामानंद नगर पोलिसांनी एका घरफोडीचा छडा लावत चौघांच्या मुसक्या आवळल्या. चोरट्यांकडून तब्बल 310 ग्रॅम सोने आणि 250 ग्रॅम चांदीसह 36 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे इतर दोन घरफोडी आणि एक दुचाक
जळगावातील घरफोडीचा छडा; चौघांना अटक


जळगाव, 27 सप्टेंबर (हिं.स.) रामानंद नगर पोलिसांनी एका घरफोडीचा छडा लावत चौघांच्या मुसक्या आवळल्या. चोरट्यांकडून तब्बल 310 ग्रॅम सोने आणि 250 ग्रॅम चांदीसह 36 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे इतर दोन घरफोडी आणि एक दुचाकी चोरीचा असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश वर रेड्डी यांनी दिली आहे. जळगाव शहरातील मोहाडी रोड, पार्वतीबाई काळे नगर येथील नरेंद्र बाध हे बाहेरगावी गेले असताना 15 मे ते 1 जून या कालावधीत त्यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. यावेळी चोरट्यांनी घरातून 357 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 250 ग्रॅम वजनाची चांदीची भांडी व दागिने आणि 85 हजार रुपये रोख रक्कम तसेच डीव्हीआर, वायफाय मॉडेल असा एकूण 36 लाख 83, हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत 1 जून रोजी लिलाधर शांताराम खंबायत यांनी रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

या गुन्ह्याचा तपास करत असताना रात्रीच्या गस्तीवर असताना सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या पथकाला दोन इसम संशयीत रित्या फिरताना आढळले. पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी मोहाडी रोड येथील घरफोडीची कबुली दिली. आरोपी रवि प्रकाश चव्हाण (21, रा. तांबापूरा) आणि शेख शकील शेख रफीक (30, रा. रामनीगंज) यांना अटक करण्यात आली.आरोपींच्या माहितीवरून त्यांचे साथीदार जनंद उर्फ मस्तकीम भिकन शहा आणि गुरुदयालसिंग मनजित टाक यांनाही अटक करण्यात आली. तपासादरम्यान, आरोपींनी सोने-चांदीचे दागिने सुरत व जामनेर येथे विकल्याचे कबूल केले. त्यानुसार रामानंद नगर पोलिसांनी वेगाने कारवाई करत, चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 33 लाख 83 हजार किमतीचे 310 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 250 ग्रॅम चांदीची लगड असा ऐवज हस्तगत करण्यात यश मिळवले. या यशस्वी कामगिरीमुळे रामानंद नगर पोलीस ठाण्यात सह इतर दोन घरफोडी आणि एक दुचाकी चोरीचा असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande