परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज मानवत तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते बाधितांना धान्याचे वाटपही करण्यात आले. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल बाधित व इतर नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक नागरिकांचे संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले. आज जिल्हाधिकारी यांनी स्वत: मानवत तालुक्यातील पूरबाधीत गावे थार, वांगी, वझुर या ठिकाणी भेट देऊन संपर्क तुटलेल्या गावांची त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बाधित व स्थलांतरीत नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांना धीर दिला. त्यांच्या हस्ते बांधितांना धान्याचे वाटपही करण्यात आले.
याप्रसंगी जिल्ह्यातील पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेले भारतीय सेनादलाच्या 54 मिडीयम रेजिमेंट 56 एपीओचे लेफ्टनंट कर्नल अभिषेक, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, तहसिलदार पांडुरंग माचेवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis