चंद्रपूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। “पारदर्शकता, जबाबदारी आणि उत्तरदायित्व हेच माहिती अधिकार कायद्याचे खरे सामर्थ्य आहे. या कायद्यामुळे शासन व प्रशासन अधिक लोकाभिमुख झाले असून नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. प्रशासनातील पारदर्शकता वाढवून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी या कायद्याचा प्रभावी वापर होणे आवश्यक असल्याने मनपाच्या प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने माहिती अधिकार कायदा आत्मसात करून लोकांच्या विश्वासास पात्र ठरावे असे आवाहन प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांनी माहिती अधिकार दिन साजरा करतांना केले.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे माहिती अधिकार दिन 29 सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनातर्फे 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो मात्र यादिवशी शासकीय सुट्टी असल्याने सोमवार 29 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा करण्याचे शासन निर्देश होते. या दिनानिमित्त मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत माहिती अधिकार अधिनियमाबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात नागरिकांना शासनाने दिलेला माहितीचा हक्क याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी “माहिती अधिकार कायद्याची शपथ घेतली.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे माहिती कायद्याअंतर्गत नवीन 11 सेवा या ऑनलाईन स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे, या 11 सेवांचे लोकार्पण प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. आता एकुण 71 सेवा या मनपातर्फे ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात येणार आहेत. याप्रसंगी माहिती अधिकार कायद्यासंबंधी 10 प्रश्नांची एक प्रश्नमंजुषा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली व मर्यादित वेळेत अचूक उत्तरे दिल्याबद्दल अमित फुलझेले,डॉ. अमोल शेळके, प्रतीक देवतळे या अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संदीप चिद्रवार, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,सहायक आयुक्त अनिलकुमार घुले,नगरसचिव नरेंद्र बोबाटे, उपअभियंता प्रगती भुरे, उपअभियंता वैष्णवी रिठे, डॉ.नयना उत्तरवार,अमूल भुते,आशिष भारती,अतुल टिकले, नरेंद्र पवार, सोनू थूल,सागर सिडाम तसेच मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव