छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा आढावा घेतला. काल रात्रीही स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या संपर्कात असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा जलसंपदा विभागाकडून राज्याच्या एकूण स्थितीचा आढावा घेतला.
जायकवाडी धरणातून १,८८,००० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. सुदैवाने पाऊस बंद झाल्याने आता विसर्ग वाढविण्याची गरज नाही. आज रात्री ८ पर्यंत हे पाणी नांदेडपर्यंत पोहोचेल. सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
येलदरी धरणातून २९,४०० क्युसेक इतका विसर्ग होतो आहे आणि तो पूर्णपणे नियंत्रणात आहे. मांजरा आणि तेरणा नद्यांचा पूर आता ओसरला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती नियंत्रणात आहे. उजनीतून ७५,००० इतका तर सीना कोळेगावमधून ८०,००० क्युसेक इतका विसर्ग होत आहे.
नाशिक: गंगापूर धरणातून ११,००० क्युसेक इतका विसर्ग होत असून, मुळा धरणातून १०,००० क्युसेक विसर्ग सुरु आहे. पाऊस आता कमी झाला आहे. जायकवाडी धरणातून नाशिक, अहिल्यानगर भागातील धरणातून विसर्ग ८७,००० वरुन ६८,००० क्युसेकवर नियंत्रित केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणातून ५४,५०० क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, हतनूर धरणातून ६५,८०० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे.
कोकणातील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली आहेत.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis