समाधानकारक जागा न मिळाल्यास काँग्रेस स्वबळावर लढण्यास सज्ज - रमेश कीर
रत्नागिरी, 29 सप्टेंबर, (हिं. स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला समाधानकारक जागा न मिळाल्यास पक्ष रत्नागिरीत स्वबळावर लढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेईल, असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी दि
समाधानकारक जागा न मिळाल्यास काँग्रेस स्वबळावर लढण्यास सज्ज - रमेश कीर


रत्नागिरी, 29 सप्टेंबर, (हिं. स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला समाधानकारक जागा न मिळाल्यास पक्ष रत्नागिरीत स्वबळावर लढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेईल, असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी दिला आहे. रत्नागिरीतील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

​काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते रमेश कीर यांनी पक्षाची आगामी रणनीती आणि राज्यातील व स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, हुस्नबानू खलिफे, दक्षिण जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद आणि समन्वयक सुरेश कातकर उपस्थित होते.

​संविधानाच्या संरक्षणासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधणे. तसेच या शिबिराचा मुख्य उद्देश कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन करणे आणि आगामी निवडणुकांसाठी त्यांची तयारी करणे हा असल्याची माहिती रमेश कीर यांनी यावेळी दिली. सध्या कार्यकर्त्यांची मानसिकता वेगळी आहे आणि त्यांची मते जाणून घेणे आवश्यक आहे, असे कीर यांनी यावेळी नमूद केले. सध्या देशात चाललेल्या 'दडपशाहीला' विरोध करण्यासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

​राज्यात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप केला. महापुरामुळे जमिनीची धूप झाली असून लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तरीही राज्य सरकार केवळ पंचनाम्यांवर अडकून पडले आहे, अशी टीका त्यांनी केली. लोकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकारने तत्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणीदेखील काँग्रेस नेते रमेश कीर यांनी केली.

​रत्नागिरीतील स्थानिक प्रश्नांवर बोलताना कीर म्हणाले की, स्थानिक समस्या 'जैसे थे' आहेत. कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचून स्थानिक प्रश्नांविषयी लोकांचे मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्थानिक प्रश्नांबाबत काँग्रेस पक्ष म्हणून वेळोवेळी उपोषण आणि येथील शासकीय अधिकाऱ्यांकडेदेखील पाठपुरावा करत आहे. मात्र पालकमंत्री विकासात इतके गुंग आहेत की, त्यांना रस्त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही, असा उपरोधिक टोलादेखील यावेळी रमेश कीर यांनी लगावला.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे या उद्देशाने रत्नागिरीत काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना आणि मते विचारात घेतली जातील आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल. काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने लढत आहेत. देशाच्या भविष्यासाठी आणि लोकशाही मूल्यांसाठी त्यांच्या लढ्याला देशातील तरुणांनी खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे. तरुणांनी मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande