पालघर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
पालघर तालुक्यातील मुरबे येथे जिंदाल उद्योग समूहामार्फत प्रस्तावित बंदराबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत ६ ऑक्टोबर रोजी पालघर येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी होणार होती. मात्र या सुनावणीस स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमार बांधवांचा तीव्र विरोध असून ही सुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या गावांच्या महसूल क्षेत्रातील अंदाजे २०० एकर सरकारी जमिनीतून या प्रकल्पाचा कॉरिडोर जाणार आहे, त्या संबंधित गावांना आजवर कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही. रोजगाराच्या संधी, स्थानिकांचा थेट फायदा, पर्यावरणीय परिणाम याबाबतही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
जिंदाल उद्योग समूह गेल्या अनेक वर्षांपासून तारापूर औद्योगिक वसाहतीत कार्यरत असून, आजतागायत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी न दिल्यामुळे या समूहाविषयी अविश्वास असल्याचेही स्थानिकांनी निवेदनात नमूद केले आहे. सन २०१३ मध्ये नांदगाव येथे जिंदाल समूहाचे बंदर प्रस्तावित असताना त्याला मोठा विरोध झाला होता, याचीही आठवण करून देण्यात आली आहे.
आम्ही विकासकामांना विरोधी नाही, पण शासन व उद्योग समूहाने संबंधित गावांना विश्वासात न घेता जबरदस्तीने जनसुनावणी घेणे अयोग्य आहे. म्हणूनच सदर सुनावणी स्थगित करून योग्य चर्चेनंतरच नवीन तारीख जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL