छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. 2020 मध्ये झालेल्या निवडणूकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, यादृष्टीने राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त श्री.पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके तसेच राजकीय पक्षांचे विभागातील प्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री.पापळकर म्हणाले, पदवीधर नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक-18 भरुन देणे आवश्यक आहे. नमुना-18 सोबत पदवी प्रमाणपत्र अथवा गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज सादर करताना पदनिर्देशित अधिकाऱ्यास मूळ प्रमाणपत्र/गुणपत्रिका तपासणीसाठी दाखविणे आवश्यक आहे किंवा प्रमाणपत्र/गुणपत्रिकेची स्वसाक्षांकित किंवा सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली प्रत सादर करणे आवश्यक आहे. याकरीता मा.भारत निवडणूक आयोग यांनी अधिसूचित केलेल्या यादीतील विद्यापीठांतून 01 नोव्हेंबर, 2025 पूर्वी किमान 3 वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीची समकक्ष पात्रता धारण करणारा पदवीधर पात्र राहील. अर्ज मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्षपणे किंवा टपालाने सादर करता येईल. एक गठ्ठा पद्ध्तीने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. कुटुंबातील एका सदस्यास कुंटुंबातील इतर सदस्याचा अर्ज सादर करता येईल.
5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या 2020 मध्ये झालेल्या निवडणूकीसाठी 750 मतदान केंद्र व 63 अतिरिक्त मतदान केंद्र असे एकूण 813 मतदान केंद्र होते. त्यावेळी 3 लाख 52 हजार 396 एवढे मतदार होते.
मतदार नोंदणीसाठी विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत. तर सर्व जिल्हाधिकारी व अपर आयुक्त (सा.प्र) हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी असतील. सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार मिळून विभागातील 130 अधिकाऱ्यांची सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 106 पदनिर्देशित अधिकाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये सर्व उप जिल्हा निवडणूक अधिकारी, नायब तहसिलदार (निवडणूक), छत्रपती संभाजीनगरसाठी मनपाचे सहायक आयुक्त यांचा समावेश करण्यात आला आहे. मतदार नोंदणीसाठी एकूण 245 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्याही राजकीय पक्षामार्फत, पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, नागरीक कल्याण संघटना आदींकडून एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. कोणीही पात्र मतदार मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी ह्यांची माहिती देणारी अनुसूची ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे, असेही ते म्हणाले.
१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम
जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार ३० सप्टेंबर २०२५, वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी- बुधवार १५ ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी- शनिवार २५ ऑक्टोबर, नमुना क्रमांक १८ किंवा १९ द्वारे दावे स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – गुरूवार ६ नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- गुरुवार २० नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- मंगळवार २५ नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- गुरुवार २५ डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- मंगळवार ३० डिसेंबर २०२५. मतदार नोंदणी अधिकारी , सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी ,पदनिर्देशित अधिकारी ह्यांची माहिती देणारी अनुसूची ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे .
*****
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis