रायगड, 29 सप्टेंबर (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने भातशेती पाण्याखाली गेली असून तब्बल 473 हेक्टर क्षेत्रातील भातपिकांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीचा 1 हजार 388 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात ढकलला गेला आहे. मे महिन्याच्या अखेरीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने पेरणी उशिरा झाली. अनेक ठिकाणी रोपे कुजून गेली आणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च करावा लागला. मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके आता पाण्याखाली गेली आहेत. अलिबाग, पेण, खालापूर, उरण, सुधागड, महाड आदी तालुक्यांतील 83 गावांतील शेतकरी बाधित झाले आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभाग सर्वाधिक बाधित झाला असून 236 हेक्टर क्षेत्र व 747 शेतकरी संकटात सापडले आहेत, अशी माहिती प्रभारी कृषी अधिकारी हिंदुराव मोरे यांनी दिली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, सतत पाऊस चालू राहिल्यास रब्बी हंगाम लांबणीवर जाण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जमिनीत ओलावा जास्त राहिल्यास कांदा व भाजीपाला लागवड उशिरा होण्याची शक्यता आहे. बुरशीजन्य रोगांचा धोका देखील वाढला आहे. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीत आतापर्यंत 24 हेक्टर क्षेत्राचे नुकसान नोंदवले गेले आहे. तयार झालेली भातपिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांचा “हातातोंडाशी आलेला घास गेला” अशी हताश प्रतिक्रिया उमटत आहे. कृषी विभागाचे उपसंचालक प्रवीण थिगळे यांनी सांगितले की, नुकसानीचा तपशीलवार अहवाल शासनाकडे पाठविला जाणार असून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके