नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
गेल्या दोन ते तीन दिवासांत झालेल्या अतीवृष्टीमुळे गोदावरीला आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठचे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी ही परिस्थिती असून अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना मदतीसाठी शासन तत्पर असून मदतकार्य सुरू असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले.आज गोदावरी नदी परिसर जुना भाजी बाजार पटांगण व रामकुंड परिसराची मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, काल रात्री पंचवटी परिसरात व होळकर पुल येथे भेट दिली असता, प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पुर आलेला होता. आता संततधार थांबल्याने पुर ओसरला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासन 24 तास अलर्ट मोडवर असून वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन केल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. परंतु पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून शेतकऱ्यांची जनावरे, पिके व जमीनी वाहून गेलेल्या आहेत. नदीकाठावरील व्यावसायिकांनाही या पूराचा फटका बसला आहे.
ज्या गावांतील घरांमध्ये पाणी शिरले आहे त्यांचे पंचनामे सुरू असून संरक्षणासाठी गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून त्यांची निवाऱ्याची व भोजनाची सोय प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातही बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमीनी खरडून वाहून गेल्या असून 4 ते 5 फूट माती वाहून गेली आहे. शेती नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. पाणी कमी होताच त्यांचे पंचनामे तातडीने करून शासनस्तरावरून मदत करण्यात येणार आहे. व जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन व अधिकारी यांना मदतकार्य सुरू ठेवण्याच्या सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.
आगामी कुंभमेळाच्यावेळी येणा-या भाविकांची संख्या लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने वसतिगृह पाडून दुसऱ्या ठिकाणी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. पंचवटी येथील रामसेतू पुलासाठी 25 कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून हा पुल नव्याने बांधण्यात येणार असल्याचे मंत्री श्री महाजन यांनी सांगितले.
पूरस्थिती लक्षात घेता नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक धोका पत्करू नये, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV