मनमाड, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
- शहरासह आसपासच्या ग्रामीण भागात सुरु असलेल्या तडाखे बंद हस्त नक्षत्राच्या मुसळधार पावसामुळे खरिपातील प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा, मका, बाजरी, भुईमूग यासह टोमॅटो आणि भाजीपाला पिके पूर्णतः पाण्याखाली गेली असून, नुकतीच लागवड केलेल्या कांद्याच्या रोपांवरही सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक गावांत शेतीतील माती वाहून गेली असून, चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
वंजारवाडी, कर्की, सटाणे, एकवई, माळेगाव, अनकवाडे, भालूर, पानेवाडी, नागापूर, धोटाणे, हिसवळ, भार्डी, धनेर या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. अनेक शेतशिवार पूर्णतः पाण्याखाली गेले असून, पिकांचे थेट नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
पावसामुळे जनावरांचा चारा भिजल्याने चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, काही गावांचा संपर्कही तुटला आहे. नदी-नाले, ओढे, बंधारे ओथंबून वाहत आहेत, काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. परिणामी, शेतकरी आपल्या शेतांशी संपर्कही करू शकत नाही.
गावातील काही घरांच्या भिंती कोसळल्या असून, वंजारवाडी येथे एक घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा सणासुदीचा उत्साह मावळला असून, दसरा-दिवाळी सण कसे साजरे करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानग्रस्त क्षेत्राची तातडीने पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याची आणि तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. सध्या मनमाडसह परिसरातील शेतकरी मदतीच्या आशेवर आहेत. शासनाने तत्काळ हालचाल करून पंचनामे आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करावी, अशी एकमुखी मागणी सर्वत्र होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV