धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मी कायम सोबत असेन – आ. रत्नाकर गुट्टे
परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। धनगर समाज हा प्रामाणिक, कष्टाळू आणि अंगमेहनतीने उदरनिर्वाह करणारा समाज आहे. त्यांना शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सर्वांगीण विकासासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्ष
आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची ग्वाही


परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। धनगर समाज हा प्रामाणिक, कष्टाळू आणि अंगमेहनतीने उदरनिर्वाह करणारा समाज आहे. त्यांना शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सर्वांगीण विकासासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या समाजाच्या लढाईत मी खांद्याला खांदा लावून कायम सोबत राहीन,” अशी ग्वाही स्थानिक आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिली.

शहरातील राम-सीता जनसंपर्क कार्यालयासमोर धनगर समाज बांधवांनी ढोल बजाव आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान आमदार डॉ. गुट्टे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली. जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोऱ्हाडे व सहकाऱ्यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. गुट्टे म्हणाले की, “धनगर समाज हा पारंपरिकदृष्ट्या मेंढपाळी, पशुपालन, शेळीपालन आणि लघुशेतीशी जोडलेला आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असूनही या समाजाची सामाजिक व आर्थिक स्थिती दयनीय आहे. त्यामुळे आरक्षण हीच त्यांची प्रगतीची पायरी ठरू शकते. देशातील अनेक राज्यांत धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील धनगर आणि इतर राज्यातील धनगड हे एकच असल्याने महाराष्ट्रातील धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करणे न्याय्य आहे.” आंदोलनकर्त्यांनीही आपल्यावर विश्वास असल्याचे सांगून पुढेही कायम पाठीशी राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande