पालकमंत्री पंकजा मुंडेंकडून प्रशासनाचे अभिनंदन
जालना, 29 सप्टेंबर (हिं.स.) - जोरदार अतिवृष्टीनंतर जिल्ह्यात सर्वत्र रेड अलर्ट जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करत सात हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. पुरात सापडलेल्या लोकांना अन्न धान्यासह त्यांच्या जेवणाची देखील सोय केली. केवळ माणसानांच नाही तर शेतकऱ्यांच्या पशूधनाला देखील प्रशासनानेच वाचवले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी याबद्दल जिल्हाधिकारी व प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडून घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या आपत्तीत नागरिकांना त्रास होवू नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्या भागात पाण्यामुळे धोका निर्माण झाला, त्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करुन त्यांच्या निवास, जेवणा व वैद्यकीय सोय करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
प्रशासनाची तातडीने मदत ; नागरिक व पशूधनाला सुरक्षित हलवले
गोदावरी नदीतून सुमारे 3 लाख क्सुसेक इतका विसर्ग करण्यात आल्याने. जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि परतुर तालुक्यांतील गोदावरी नदीच्या काठावरील सुमारे 38 गावे बाधीत झाली आहेत. यामुळे बऱ्याचशा गावांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. परतूर, अंबड, घनसावंगी या तालूक्यातील सुमारे 7 हजाराहून अधिक नागरिकांना विविध गावांतून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आले असून, यातील 7 हजार 599 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाजमंदिरात केलेल्या निवास व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. 23 ठिकाणी अशा निवासव्यवस्था करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. अनेक शेतकर्यांच्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करुन त्यांना चारा देण्यात येत आहे. कोणालाही इजा पोहोचू न देता नागरिकांची काळजी घेतल्याबद्दल मुंडे यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 26 महसूल मंडळातील गावे बाधीत झाली असून, येथील नागरिकांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. काही भागात घरांची पडझड झाली असून शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पूरस्थिती ओसरल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल. सध्या नागरिकांना शासनस्तरावरून तातडीची मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी