कोल्हापूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या महामंडळाच्या कर्ज योजनांचे व्याजदर कमी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार एक टक्क्याने व्याजदर कमी करण्याचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या धोरणाची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून केली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पंधरवड्यापूर्वी झाली. या वार्षिक सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केडीसीसी बँक
याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेकडे महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या योजना मोठ्या प्रमाणात राबविल्या जातात. तसेच; दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी बँकेने गोकुळ व वारणा दूध संघ म्हशीसाठी व्याज परतावा योजना सुरू केलेली आहे. या सर्व कर्ज योजनांची व्याजदर दर साल दर शेकडा १३ टक्केप्रमाणे होते. ते एक टक्क्यांनी वजा करून यापुढे १२ टक्के व्याज आकारणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
याबाबत माहिती देताना बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्यावतीने राबवल्या जाणाऱ्या विविध आर्थिक विकासाच्या कर्ज योजना राबवण्यामध्ये केडीसीसी बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. या वित्तपुरवठ्याच्या माध्यमातून समाजातील बेरोजगार युवक युवतींच्या हाताला उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला जातो. बँकेने एक टक्का व्याज कपातीचे धोरण घेऊन अशा रोजगार निर्मितीला पाठबळ दिले आहे.
बँकेच्या व्यक्तिगत कर्ज पुरवठा विभागामार्फत पर राज्यातील दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा केला जातो. अशा दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी बँकेने ज्यादा तरतूद केली आहे. मुरा म्हशीसाठी रू. एक लाख तीस हजारावरून दीड लाख केली. मेहसाणा म्हशीसाठीची तरतूद एक लाख दहा हजारावरून एक लाख तीस हजार करण्यात आली. जाफराबादी म्हशीसाठी एक लाखावरून एक लाख वीस हजार रुपये करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व गजानन पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar