- वर्षभरात आणखीन ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणे अपेक्षित
छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
राज्याने उद्योग क्षेत्रासाठी नवीन १२ धोरणे निश्चित केली आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्रात राज्य देशात क्रमांक १ वर आहे. येत्या वर्षभरात आणखीन ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणे अपेक्षित असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.
उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्यशासन अभिनव धोरणे राबवित आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र देशात औद्योगिक गुंतवणूकीत अव्वल आहे. छत्रपती संभाजीनगर येथे गुंतवणूकीस उद्योग जगताची पसंती आहे. त्यासाठी येथील उद्योग व संलग्न क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
शेंद्रा येथील ऑरिक सिटी या पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीचा ६ वा वर्धापन दिन व समृद्धी महामार्ग ते शेंद्रा औद्योगिक वसाहत जोडमार्गाचे लोकार्पण आज करण्यात आले. या कार्यक्रमास उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ऑरिक सिटी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात उद्योग मंत्री सामंत यांच्या हस्ते बोधचिन्ह, संकेतस्थळ, पोर्टल यांचे अनावरण करण्यात आले. तसेच ऑरिक सिटी च्या सहा वर्षाच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या कॉफी टेबल बुक चे विमोचन करण्यात आले.
उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, अतिवृष्टी ने बाधित शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. या संकटात शासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. उद्योग जगतानेही या आपल्या संकटात सापडलेल्या भावांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत सहयोग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, ऑरिक सिटीचे यश हे त्यासाठी जमीन देणारे शेतकरी आणि त्यावर उद्योग उभारून गुंतवणूक करणारे उद्योजक या दोघांचे आहे. या वसाहतीचे आणखीन प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. अतिवृष्टीमुळे औद्योगिकक्षेत्रानजिक शेती, गावांना काही समस्या निर्माण झाल्या, त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना नजिकच्या काळात करण्यात येतील. येत्या वर्षभरात आणखीन ५ हजार एकर जागा उपलब्ध करून देऊ. बिडकीन या औद्योगिक वसाहतीनजिक असणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि प्रकल्प बाधितांचे प्रश्न एक महिन्याच्या आत सोडवावे, असे निर्देश त्यांनी दिले. ऑरिक सिटीचे कामकाज प्रभावी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे जॉब कार्ड तयार करू. आपण स्वतः प्रत्येक महिन्यात एकदा येऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis