पुणे, 29 सप्टेंबर (हिं.स.)महावितरण’च्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांच्या १५७ किलोवॉटपर्यंत वीजभारवाढीच्या ऑनलाइन अर्जांना ‘महावितरण’कडून आता स्वयंचलित पद्धतीने मंजुरी मिळणार आहे. त्यासाठी कार्यालयात चकरा अथवा मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याची गरज राहणार नाही. ‘महावितरण’च्या संकेतस्थळावर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही, अशा ठिकाणी ग्राहकांनी शुल्काचा भरणा केल्यानंतर त्यांना केवळ २४ ते ४८ तासांमध्ये मागणीप्रमाणे वाढीव वीजभार स्वयंचलित पद्धतीने मंजूर आणि कार्यान्वित होणार आहे.
वीजग्राहकांना ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) सेवा देण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केली आहे. त्यानुसार लघुदाब वर्गवारीतील सर्व ग्राहकांसाठी वीजभारात वाढ किंवा कमी करण्याची प्रक्रिया ऑनलाइनद्वारे स्वयंचलित करण्यात आली आहे. सेवा पंधरवड्याचे निमित्त साधून महावितरणकडून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.लघुदाब वर्गवारीमध्ये वीजभारवाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्याच्या निर्णयामुळे ‘महावितरण’च्या ग्राहकसेवेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. त्याचा प्रामुख्याने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी घरगुती ग्राहकांना तसेच प्रामुख्याने औद्योगिक, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु