नाशिक, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग पुढे सरसावला आहे. परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा पूरग्रस्त सेवा अभियान राबविले जात आहे तर आबासाहेब मोरे प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आधार देत आहेत. सेवामार्गाच्या हजारो सेवाकेंद्रांमधून सध्या पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक साहित्य संकलित केले जात आहे.
सेवामार्गाने नेहमीच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना आजवर मदत केली आहे. त्याच भावनेतून मराठवाड्यातील पूरग्रस्त जनतेसाठी पूरग्रस्त सेवा अभियान राबविण्यात येत आहे. याबाबत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी गरजू आणि नुकसानग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी सर्वच सेवाकेंद्रांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून सेवेकऱ्यांनी या अभियानात जास्तीत जास्त मदत संकलित करावी असे आवाहन केले आहे. बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या माध्यमातून मदत वाटप संदर्भात एक मार्गदर्शक माहितीपत्र प्रसिद्ध केले असून त्यानुसार संपूर्ण राज्यात नियोजन केले जात आहे.
पूरग्रस्त मदत सेवा अभियानाला पाचोरा तालुक्यातून सुरुवात, दीडशे कुटुंबाला मदत
सेवामार्गाच्या जळगाव विभागातर्फे पाचोरा तालुक्यातील गहुले, कडेवडगाव या गावांमधील दीडशे कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पूरग्रस्तांना मानसिक आधाराबरोबरच स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांचे पुनर्वसन कसे होईल या दृष्टीनेही स्थानिक सेवेकरी योगदान देणार आहेत. अन्न, वस्त्र, औषधे, गरजोपयोगी वस्तू अशा स्वरूपात हे साहित्य संकलित करून त्याचे वाटप केले जात आहे.तर आबासाहेब मोरे जालन्या सह मराठवाड्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आधार देत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV