रायगड, 29 सप्टेंबर (हिं.स.)अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) गंभीर तांत्रिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक त्रुटींमुळे नोटीस बजावली आहे. आयोगाने याबाबतची अधिकृत माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी दिली.
2024-25 शैक्षणिक वर्षासाठी एमबीबीएस सीट्सचे सशर्त नुतनीकरण जरी मिळाले असले, तरी आयोगाच्या तपासणीत अनेक त्रुटी उघड झाल्या आहेत. यामध्ये शिक्षक व रेसिडेंट डॉक्टरांची कमतरता, मृत्यू आकडेवारीतील विसंगती, बाह्यरुग्णांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी, तसेच अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या शवांची अनुपलब्धता आदींचा समावेश आहे. तसेच, क्लिनिकल पॅथॉलॉजी विभागातील तपासण्या अपुऱ्या असून, महाविद्यालयात अद्याप MRI सुविधा उपलब्ध नाही.
अशा त्रुटी राज्यातील अन्य अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही आढळून आल्या आहेत. अलिबागसह सोलापूर, बारामती, चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, पुणे, मुंबई आदी शहरांतील एकूण ३० महाविद्यालयांना एनएमसीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
एनएमसीने अलिबागच्या महाविद्यालयाला पुढील चार महिन्यांत त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले असून, यानंतर फेरतपासणी केली जाईल. समाधानकारक सुधारणा न झाल्यास कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयाला या निर्णयाविरोधात ६० दिवसांच्या आत अपील करता येणार आहे.
या प्रकरणावर महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची प्रतिक्रीया मिळवण्याचा प्रयत्न असफल ठरला. त्यामुळे प्रशासनाकडून यावर अधिकृत भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. प्रशासनाने या त्रुटींवर तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरते, अन्यथा गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण धोक्यात येण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके