नांदेड, 29 सप्टेंबर (हिं.स.) | नांदेडजिल्ह्यात ऑगस्ट 2025 या महिन्यात अतिवृष्टी, पुरामुळे पिक नुकसान झालेल्या व V.K. नंबर भेटलेल्या शेतकऱ्यांनी नजिकच्या सेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी. जेणे करुन त्यांच्या खात्यावर शासनामार्फत डिबीटी पद्धतीने मदतीची रक्कम थेट जमा होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे 7 लाख 74 हजार 313 इतक्या शेतकऱ्यांचे ६,४८,५३३.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शासनास एकूण 553.34 कोटी रुपये मदत निधीची मागणी केली होती. ज्यानुसार शासनाने 18 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी सदर निधी मंजुर केला आहे.
ही मंजुर रक्कम बाधित शेतकरी यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार असुन आता पर्यंत जिल्हयातील 3 लाख 10 हजार 126 इतक्या शेतकऱ्यांना 230 कोटी 46 लक्ष इतक्या रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे. माहिती भरण्यात आलेल्या शेतकरी यांचे V.K. नंबर त्या गावचे तलाठी यांच्यामार्फत गावात प्रसिध्द करण्यात आली आहे व येत आहे. सदर V.K. नंबरद्वारे सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकरी यांचे खात्यावर थेट मदतीची रक्कम डिबीटी पद्धतीने जमा होणार आहे. उर्वरीत शेतकऱ्यांची माहिती पुढील 4 ते 5 दिवसात भरण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis