* सर्वोत्कृष्ट नियतकालिक, डिजिटल मीडिया इनोव्हेशन्स, कार्पोरेट कम्युनिकेशन एक्सलन्सचा पुरस्कार
मुंबई, 29 सप्टेंबर (हिं.स.)
: पब्लिक रिलेशन्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट नियतकालिक, डिजिटल मीडिया इनोव्हेशन्स व कार्पोरेट कम्युनिकेशन एक्सलन्सचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले.
गोव्यातील पणजी येथील हॉटेल फर्न कदंबामध्ये आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या जागतिक संवाद परिषदेमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अभिनेते व दिग्दर्शक मिलिंद तेंडुलकर, `पीआरसीआय`चे अध्यक्ष एम. बी. जयराम, डॉ. गीता शंकर, चिन्मयी प्रवीण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय जनसंपर्क विभाग व त्यांच्या टीमवर्कला दिले आहे. भविष्यातही, महापारेषणचा जनसंपर्क विभाग सातत्यपूर्ण कामगिरी करून महापारेषणचे नाव उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी