पालघर - पुरग्रस्त महिलांसह लहान मुलांचा जीव वाचवण्यात पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पालघर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी दरम्यान पुरामध्ये अडकलेल्या एकूण ६६ महिला व लहान मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात डहाणू व वाणगाव पोलीस ठाण्याच्या पथकांना यश आले. या उल्लेखनीय कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला. भारतीय हवामान
पुरग्रस्त महिलांचा आणि लहान मुलांचा जीव वाचवण्यात पालघर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी


पालघर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।

पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी दरम्यान पुरामध्ये अडकलेल्या एकूण ६६ महिला व लहान मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात डहाणू व वाणगाव पोलीस ठाण्याच्या पथकांना यश आले. या उल्लेखनीय कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला.

भारतीय हवामान खात्याने २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान पालघर जिल्ह्यास रेड अलर्ट जाहीर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

२८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता डहाणू पोलीस ठाण्याला माहिती मिळाली की, चरी-आशागड रोडवरील धोडीपाडा पुलावर एक टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. DD03/Q/9303) पाण्यात अडकला आहे. गाडीत १६ महिला व चालक होते.

तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे, पोलीस निरीक्षक किरण पवार, सपोनि तुषार पाचपुते तसेच स्थानिक पोलीस, आरसीपी पथक, अग्निशमन दल व ग्रामपंचायत कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोरीच्या साहाय्याने सर्वांना सुरक्षित बाहेर काढून शासकीय विश्रामगृह, डहाणू येथे सोय करण्यात आली.

यानंतर, वाणगाव-चारोटी मुख्य रस्त्यावर मौजे पिंपळशेत येथे MH 48 DC 8759 क्रमांकाची खासगी बस पाण्यात अडकली. सपोनि तुषार पाचपुते व पथकाने तातडीने धाव घेतली व बसमधील ५० महिला व लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था वाणगाव येथे करण्यात आली.

दोन्ही घटनांमध्ये महिलांचा तातडीने बचाव करून संभाव्य जीवितहानी टाळण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. या मोहिमेत यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर, श्रीमती अंकिता कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणू यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू व वाणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार तसेच आरसीपी पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande