रत्नागिरी, 29 सप्टेंबर, (हिं. स.) : महावितरणच्या रत्नागिरी परिमंडल कार्यालयात स्त्री शक्तीला समर्पित नवरात्र उत्सवानिमित्त ‘सन्मान सौदामिनींचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून महावितरणमध्ये कार्यरत महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कुटुंब व कार्यालय यामधील समतोल साधणे हे अत्यंत कठीण कार्य असून, महिला हे कार्य अतिशय कुशलतेने पार पाडतात, असे मत मुख्य अभियंता अनिल डोये यांनी यावेळी व्यक्त केले.
विजेसारख्या तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांना पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. काही कर्मचारी महिलांनी, सर्वच स्तरातील महिलांच्या सामाजिक व आर्थिक संघर्षांचा उल्लेख करत आपल्या प्रवासातील अनुभव व्यक्त केले. अनेक महिलांनी ज्या प्रकारे कठीण प्रसंगांना तोंड देत यशस्वी कारकीर्द घडवली, ते उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. या उपक्रमामुळे महिलांच्या कार्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त होत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
य प्रसंगी कार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस, जितेंद्र फुलपगारे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे, प्रभारी सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) प्रणाली निमजे, वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) अजय निकम व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन उपव्यवस्थापक (मासं) बाळकृष्ण झोरे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी