कोल्हापूर, 29 सप्टेंबर (हिं.स.) एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आज कोल्हापूर दोऱ्यावर आले आहेत. एका बाजुला संयोजकांनी त्यांचे कोल्हापूर विमानतळावर घोषणा देऊन स्वागत केले असताना कोल्हापूर शहरात मात्र त्यांच्या येण्याला कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला.
खा. असदुद्दीन ओवैसी कोल्हापूर शहरात भेट, इचलकरंजी शहरात जाहीर सभा आणि कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी त्यांचा दौरा निश्चित झाला होता. त्यानुसार त्यांचे आज दुपारी विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या संयोजक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे 'शेर आया' अशा घोषणा देऊन स्वागत केले.
त्यानंतर खा. असदुद्दीन ओवैसी नमाज पठण करण्यासाठी बागल चौकातील मज्जिदमध्ये येणार असल्याची माहिती हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते बागल चौकात जमा झाले आहेत. खा. ओवैसी या ठिकाणी आल्यास तीव्र विरोध करणार असल्याचा इशारा हिंदूवादी संघटनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे त्यांनी पोलीसांच्या सुचनेनुसार नमाजसाठी मस्जीदकडे जाणे टाळले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar